पोलिसांची मोठी कारवाई; तळ उध्वस्त

नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबुजमाडमध्ये घुसून गडचिरोली पोलीस दलाच्या सी -६० जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. यात दोन नक्षलवादी ठार तर चार गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी भुसूरूंगस्फोटाचे साहित्य आणि शस्त्रसाठा सापडला आहे. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

२ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह पाळला जाणार आहे. शनिवारी रात्री उशिरा गडचिरोली पोलिस दलातील सी-६० च्या पथकाला अबुजमाड येथे नक्षलवादी तळ उभारून प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सी-६० कमांडोंनी कारवाई करताच सुमारे ८० नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याने एक तास जोरदार चकमक उडाली. यानंतर जवानांनी शनिवारी सकाळी अबुजमाड जंगलात शोध घेतला असता नक्षलवाद्यांनी पुन्हा आयईडी स्फोट घडवून त्यांच्यावर गोळीबार केला. यास जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवादी पसार झाले. चकमकीनंतर जवानांना जंगलात दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. घटनास्थळावरील रक्ताचा सडा बघता आणखी किमान ३  ते ४ नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविणे सुरू आहे. घटनास्थळी  हत्यारे,  भुसूरूंगस्फोटाचे साहित्य सापडले.