18 November 2019

News Flash

उदयनराजे विजयी, मात्र मताधिक्य घटले

शिवसेनेचे नवखे उमेदवार नरेंद्र पाटील यांना ४०.५७ टक्के मते मिळाली आहेत.

संग्रहित छायाचित्र

विजय पाटील

महायुतीने सातारा जिल्ह्यात पाय रोवले

लोकसभेच्या सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली असली,तरी मोठय़ा मताधिक्याचा करिष्मा मात्र त्यांना दाखवता आला नाही. राजेंचे गतखेपेचे मताधिक्य ३ लाख ६६ हजार ५९४ वरून १ लाख २६ हजार ५२८ मताधिक्यावर घसरल्याने उदयनराजे व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही चिंतेची बाब असून, महायुतीने सातारा जिल्ह्यत पाय रोवल्याचे सिध्द होत आहे. परिणामी विधानसभेच्या लढती हातघाईनेच होतील, अशी चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे.

खासदार उदयनराजे यांचा राजकीय पटलावरील दबदबा, सर्वपक्षीय नेत्यांबरोबरचा दोस्ताना, राष्ट्रवादीचे हुकमी पाठबळ, शरद पवारांवर श्रध्दा ठेवणारा मोठा मतदारवर्ग आणि यापूर्वीची नाराजी पाठीवर टाकून राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेली प्रामाणिक साथ या बाबी जमेच्या ठरल्याने मताधिक्य घटूनही भाजपच्या मोदी त्सुनामीत साताऱ्यातून भोसलेंचा विजय निश्चित झाला. मात्र, या खेपेस त्यांना एकतर्फी विजयाची परंपरा कायम राखता आली नाही. उदयनराजेंना सातारच्या होमपीचवर एकतर्फी मताधिक्य मिळाले नसल्याचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सातारा, कोरेगाव, कराड उत्तर व वाई या विधानसभेच्या मतदारसंघातून उदयनराजेंना गत खेपेपेक्षा कमी, परंतु मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना विधानसभेसाठी राजेंचे पाठबळ कामी येईल, असे राष्ट्रवादीच्या गोटात आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. परंतु, उदयनराजे मतदानकेंद्र निहाय मतदान गांभीर्याने घेणार असल्याने त्याचाही  भविष्यात परिणाम दिसून येणार आहे.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन उदयनराजे भोसले यांनी रिंगणात उतरायचे आणि मताधिक्याने विजयी व्हायचे असे गेल्या दोन निवडणुकांमधील चित्र या खेपेस मात्र बदलले.

एकूण मतदानाच्या ५१.९१ टक्के मते उदयनराजेंना मिळाली,तर  शिवसेनेचे नवखे उमेदवार नरेंद्र पाटील यांना ४०.५७ टक्के मते मिळाली आहेत. त्यात नरेंद्र पाटील यांनी पाटणच्या घरच्या मैदानावरून १८ हजार १५२ मताधिक्य घेतले. काँग्रेसनेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करीत असलेल्या कराड दक्षिणमधूनही पाटील यांनी ४ हजार ८२८ मताधिक्याची नोंद केली आहे.

महायुतीच्या ताकदीवर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी कडवे आव्हान दिले. पाटलांनी केवळ तीन आठवडय़ांच्या कालावधीत ४० टक्क्यांवर मते खेचत साताऱ्याची लढत एकतर्फी नसून, मतदारांमध्ये महायुतीला विरोधक म्हणून भक्कम स्थान असल्याचे दाखवून दिले आहे. नरेंद्र पाटील यांना प्रचारासाठी मोठा कालावधी मिळाला असता,तर निवडणुकीचा निकाल विलक्षणही ठरला असता असेच सध्या म्हणावे लागत आहे.

नरेंद्र पाटील यांनी निवडणूक ऐन रंगात आली असताना सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंना आव्हान ठरणारे २३ मुद्दे उपस्थित करून आपली उमेदवारी आणखी प्रभावी ठरवली होती. या मुद्यांना राजेंनी मात्र उत्तरे देणे टाळल्याने त्याचाही काहीसा परिणाम मतदारांवर दिसून आला.

अलीकडेच महायुतीने राज्यमंत्रीपदाचे दर्जे देऊन तीन नेतृत्व या मतदारसंघात उभी करून मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सतत संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणीला बळ दिले होते. त्यात अनेक जण भाजप व शिवसेनेच्या गळालाही लागले होते. परिणामी महायुतीही सक्षम पर्याय म्हणून सातारकरांसमोर येत असतानाच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये व तेथून शिवसेनेच्या झेंडय़ाखाली येत धनुष्यबाणाची उमेदवारी घेण्यास नरेंद्र पाटील यांना फारच उशीर झाला. दरम्यान, उदयनराजेंनी मतदारसंघातील नेत्यांच्या, स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटींवर भर देत आपली उमेदवारी आघाडीवर ठेवली होती. भाजपने संघटनात्मक बांधणी जोमाने केल्याने साताऱ्याच्या जागेसाठी त्यांचा आग्रह होता. परंतु, शिवसेनेने या जागेवर आपला हक्क कायम ठेवल्याने भाजपच्या गोटात नाराजीचा सूर होता. त्याचाही काहीसा फटका नरेंद्र पाटलांना बसला. अशाही स्थितीत नवखे असणाऱ्या नरेंद्र पाटलांनी ४० टक्के मते मिळवण्याची केलेली कामगिरी मोठीच मानली जात आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला पाटण व कराड दक्षिणमधून मताधिक्य मिळाल्याने महायुतीच्या गोटात दिलासादायक वातावरण आहे.

सातारा मतदारसंघात इव्हीएम मशीनच्या माध्यमातून ९ उमेदवारांसाठी ११ लाख ९ हजार २६० मतदान झाले होते. तर, ८ हजार ४९७ पोस्टल मतदानापैकी २ हजार ३२३ मते बाद निघाल्याने एकूण ११ लाख १७ हजार ७५७ मतांपैकी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना ५ लाख ७९ हजार २६ (५१.९१ टक्के) तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना ४ लाख ५२ हजार ४९८ (४०.५७ टक्के) मते मिळाली. बहुजन वंचित आघाडीचे सहदेव अहिवळे ४० हजार ५६३ (३.६५ टक्के) मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले. मतयंत्रावरील कोणत्याही उमेदवारास पसंती नसल्याच्या ‘नोटा’ या पर्यायाला ९ हजार २२७ (०.८३ टक्के) मते नोंदली गेली.

First Published on May 25, 2019 12:57 am

Web Title: udayanraje won but the votes decreased