शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. राम मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

राम मंदिर रखडल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले. राऊत यांनी लखनौत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, शिवसेनेने वेळोवेळी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशातील हिंदूंसाठी हा महत्त्वाचा विषय असून मी योगी आदित्यनाथांशी याच संदर्भात चर्चा केली. राम मंदिराचे काम तातडीने सुरु व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातील परवानगी आणि सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातही योगी आदित्यनाथांशी चर्चा केली.

राम मंदिरावरुन शिवसेना आक्रमक झाली असून दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी राम मंदिरावरुन भाजपाला फटकारले होते. अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे सरकारला जमत नसेल, तर तसे जाहीर करावे. आम्ही ते उभारू. ‘अच्छे दिन’चे नारे देत सत्तेवर आलेल्या सरकारने नंतर त्या सर्व घोषणा म्हणजे ‘जुमलेबाजी’ होती, असे निर्लज्जपणे जाहीर केले. मग आता राममंदिर हासुद्धा जुमलाच होता का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला होता.