राज्यात मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाचं आंदोलन सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्र लिहून उत्तर दिलं. महत्त्वाचं म्हणजे मंदिरं खुली करण्यासाठी राज्यपालांना देण्यात आलेल्या निवदेनावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ‘यॉर्कर’मध्ये पकडलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं खुली करण्यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. मागील तीन महिन्यांपासून या मुद्यासंदर्भात शिष्टमंडळं माझी भेट घेत आहे. राजकीय नेते, धार्मिक शिष्टमंडळं, स्वयंसेवी संस्था यांनी भेट घेऊन मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. या मागणीवरील कारवाई संदर्भात यातील काही शिष्टमंडळांची निवेदन पत्रासोबत जोडली आहेत,” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं होतं.

आणखी वाचा- …तर प्रत्येक भाषणाच्या सुरूवातीला हिंदूह्रदयसम्राट म्हणा; ठाकरेंना चंद्रकांत पाटील यांचं आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचं मुद्यांवरून राज्यपालांना कोंडीत पकडलं. “आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो,” असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर देताना दिलं.

आणखी वाचा- बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल

आणखी वाचा- आपल्या सैन्यानं काय करायचं हे मुख्यमंत्र्यांनी बोलायचं नसतं, तसंच…; संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला

आम्हाला कुणीही हिंदुत्वाचे धडे देऊ नये-संजय राऊत

“उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. मुख्य म्हणजे ज्यांनी या देशामध्ये हिंदुत्वाचा वणवा पेटवला आणि संपूर्ण देश हिंदुत्वमय केला, अशा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपूत्र आहेत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना किंवा आम्हाला कुणालाही हिंदुत्वाचे धडे देण्याची तशी गरज नाही. आमचं हिंदुत्व पक्कं आहे. भक्कम पायावर उभं आहे. आमचा आत्मा हिंदुत्वाचा, मन हिंदुत्वाचं आहे. आम्ही आंतरबाह्य हिंदुत्ववादी आहोत,” असं उत्तर संजय राऊत यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर दिलं आहे.