News Flash

शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधासभेमध्ये बोलताना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरुवात मार्चपासून होईल. कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी १५ दिवसात योजना जाहीर केली जाईल.

सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ असे महाविकास आघाडीकडून सातत्याने सांगितले जात होते. अखेर ती घोषणा आज करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची योजना जाहीर केली असली तरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असे म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंतच कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून फक्त विरोधाची भूमिका घेत आहे. आधीच्या सरकारला शक्य झाले नाही ते आम्ही करुन दाखवलं असं उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

– गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.

– वर्तमानपत्राचा दाखला देऊन विदर्भाचा विकास झालेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

– देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तुम्ही काम केलेलं नाही, असं मी कुठेही म्हटलेलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

– विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचा आहे.

– विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर ठेवणार नाही.

– पंतप्रधान मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात, मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत.

– मोदीजी हे भाजपाचे नाही, देशाचे पंतप्रधान ते जागतिक नेते आहेत.

– प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल.

– विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नाही.

– सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.

– विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे.

– गोसी खुर्द प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही.

– यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार.

– सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही.

– समुद्धि महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल.

– व्याजापोटी अडीच हजार कोटी वाचवले.

– कृषी समृद्धि केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.

– पाच लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.

– धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे २०० रुपये देणार.

– आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

– अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार.

– आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार.

– पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

– लोणार सरोवराचं सौंदर्य संमोहित करुन सोडणार आहे.

– विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढवणार.

– जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार.

– विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.

– मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 3:58 pm

Web Title: uddhav thackeray slam bjp maharashtra assembly dmp 82
Next Stories
1 एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला-पवार
2 कॅगचा अहवाल अकाऊंट पद्धतींमधील दोषांमुळे-फडणवीस
3 कॅगचा अहवाल गंभीर; शरद पवारांची चौकशीची मागणी
Just Now!
X