मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकांची ‘केअर लिस्ट’ जाहीर

चिन्मय पाटणकर, पुणे</strong>

बोगस संशोधन पत्रिकांना चाप लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकांची यादी (केअर लिस्ट) जाहीर केली आहे. मात्र, या संशोधन पत्रिकांमध्ये बहुतांशी इंग्रजी संशोधन पत्रिकांचा समावेश असून प्रादेशिक भाषांतील संशोधन पत्रिकांना ‘केअर लिस्ट’मध्ये स्थान का नाही, असा प्रश्न उपस्थित करत प्रादेशिक भाषांतील संशोधन पत्रिकांवर अन्याय होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

अनेक प्राध्यापक बोगस संशोधन पत्रिकांमध्ये संशोधन प्रबंध छापून आणत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत उघडकीला आले. अशा प्रकारांतून देशातील संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी यूजीसीने पुढाकार घेतला. विविध वीस ज्ञानशाखांमधील राष्ट्रीय संस्थांचा समावेश असलेल्या महासंघाची यूजीसीने स्थापना केली. या सदस्य संस्थांनी संबंधित शाखांमधील गुणवत्तापूर्ण संशोधन पत्रिकांची यादी तयार केली. ही यादी विशेष विभागाकडून तपासून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या यादीत बहुतांश इंग्रजीतील संशोधन पत्रिकांचा समावेश असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

प्रादेशिक भाषेतील ज्ञाननिर्मिती त्या समाजाच्या भाषेतूनच पोहोचणे गरजेचे असते, मात्र इतिहास, समाजशास्त्रांशी संबंधित असलेली मराठीतील समाजप्रबोधन पत्रिका, आजचा सुधारक, नवभारत, पुरोगामी सत्यशोधक अशा काही महत्त्वाच्या संशोधन पत्रिकांचा यादीत समावेश नाही, अशी माहिती प्राध्यापकांनी दिली. मात्र काही संशोधन पत्रिका राहिल्या असल्यास वरिष्ठ प्राध्यापकांचे अनुमोदन घेऊन त्यांची नोंदणी केल्यास यादीत समावेश करता येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील यूजीसी कक्षाच्या सदस्या डॉ. शुभदा नगरकर यांनी स्पष्ट केले.

विद्याशाखानिहाय संशोधन पत्रिका

‘केअर लिस्ट’मध्ये विद्याशाखानिहाय संशोधन पत्रिका निवडण्यात आल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेतील ३६३, समाजशास्त्रातील २५८, कला आणि मानव्यता शाखेतील १७०, आंतरविद्याशाखीय २४ आणि भारतीय भाषांतील ६० संशोधनपत्रिकांचा यादीत समावेश आहे. त्याशिवाय वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस या दोन्ही स्रोतांमध्ये समाविष्ट असलेल्या संशोधन पत्रिकांनाही मान्यता देण्यात आली आहे.

प्रादेशिक भाषांतील संशोधन पत्रिका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले नाही. केंद्रीय पद्धतीने काम करताना प्रत्येक भाषेतील संशोधन पत्रिकांचा विचार करण्याला मर्यादा आहेत. जाहीर केलेली यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे. त्यासाठी संशोधनपत्रिकांनी ‘केअर लिस्ट’च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यांचाही यादीत समावेश केला जाईल.

      – डॉ. भूषण पटवर्धन, अध्यक्ष, यूजीसी केअर समिती