जन्माला न आलेल्या बाळाचा आईच्या पोटात असलेला हाडांचा सांगाडा काढण्यात येथील डॉक्टरांच्या पथकाला यश आले. विशेष म्हणजे तब्बल ३६ वर्षे हा सांगाडा आईच्या उदरात होता. वैद्यकीय विश्वातील ही अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया मानली जात असून सदर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मध्य प्रदेशात असलेल्या पिपारिया येथील कांताबाई गुणवंत ठाकरे या साठ वर्षीय महिलेच्या ओटीपोटात गेल्या दोन महिन्यांपासून दुखत होते. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांना तिच्या पोटात उजव्या बाजूस मोठ्ठा गोळा असल्याचे दिसले. सुरुवातीस डॉक्टरांना ती कर्करोगाची गाठ असावी असे वाटले. मात्र सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन केल्यानंतर तो गोळा अत्यंत कठीण असून कॅल्शियमसदृश घटकांचा असल्याचे निष्पन्न झाले आणि महिलेची एमआरआय चाचणी केल्यानंतर हा गोळा म्हणजे दुसरेतिसरे काही नसून जन्माला न आलेल्या एका बाळाचा सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. येथील एन.के.पी. साळवे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांच्या चमूने ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया केली.