ठिकठिकाणचे प्रतिनिधी व वार्ताहर
पुणे आणि नाशिकसह राज्याच्या काही भागांत बुधवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अवचित आलेल्या या पावसाने लोक सुखावले असले तरी रस्त्यांत पाणी साचून झालेली वाहतूक कोंडी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि झाडे पडण्याचे व घरावरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीतही झाले. वीज कोसळून नाशिक जिल्ह्य़ात दोघांचा तर जालना जिल्ह्य़ात एकाचा अंतही ओढवला.
नाशिक जिल्ह्य़ात देवळा तालुक्यातील वाजगाव येथील संजय ऊर्फ पांडू सुखदेव कोर (वय ४०) हे बुधवारी दुपारी कळवण येथे दुचाकीने जात असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे दुचाकी थांबवून भेंडी फाटय़ाजवळ ते एका झाडाखाली उभे असतानाच वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचे गेल्याच आठवडय़ात लग्न झाल्याने नातेवाईकांना कपडे घेण्यासाठी ते निघाले होते. नांदगाव तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने शेतात साठविलेले कांदे झाकण्यासाठी वैभव विजय सांगळे (१७) हा गेला असता वीज पडून ठार झाला. दुष्काळाने होरपळलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या काही भागांना बुधवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. परतूर तालुक्यात मसला शिवारात अंकुश पतंगे (वय ५५) यांचा वीज पडून मृत्यू झाला. परभणीत मंगळवारी सायंकाळी अंगावर वीज पडून बालाजी बापूराव पारवे (वय ५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.

* पुणे आणि परिसरात सोमवारी मध्यरात्री पडलेल्या जोरदार पावसानंतर बुधवारी दुपारी पुन्हा एकदा वळवाच्या सरी बरसल्या. पिंपरी-चिंचवडमध्येही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. वाई, पाचगणी परिसरातही हलकासा पाऊस झाला.
* नगर शहरासह जिल्हय़ात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर एमआयडीसी परिसरात काही वेळ गारपीटही झाली.