प्रदीप नणंदकर

अतिशय स्वस्तात सर्वाधिक प्रथिने (प्रोटिन) देणारी डाळ ही भारतीयांच्या दररोजच्या जेवणातील एके काळी महत्त्वाचा घटक होती. मात्र ‘जंकफूड’च्या वाढत्या आकर्षणामुळे दैनंदिन डाळीच्या वापरात झपाटय़ाने घट होत असून, त्याचा वापर गरजेपेक्षा निम्म्याने कमी झाला आहे.

दरवर्षी १० फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय डाळ दिन म्हणून साजरा केला जातो. नाफेड, कृषी मंत्रालय, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, आरोग्य व वाणिज्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत मोठा कार्यक्रम या वर्षी केला जाणार आहे. डाळींचा वापर वाढवावा, जगभरात डाळींच्या निर्यातीत वाढ व्हावी यासाठीही विशेष प्रयत्न यानिमित्ताने केले जाणार आहेत.

सर्वसाधारणपणे दररोज ५६ गॅ्रम प्रथिने माणसाच्या शरीरासाठी आवश्यक आहेत. दूध, डाळ व मांसाहर अशा विविध मार्गानी ते शरीरात गेले पाहिजे. मांसाहार किंवा दूध हे डाळीच्या तुलनेत महागडे असल्याने सामान्यांना कमी पशात सर्वाधिक प्रथिने मिळवण्याचा डाळ हा एकमेव सोपा पर्याय आहे. पूर्वापार जेवणात डाळ हा अविभाज्य घटक होता. मात्र आता विविध कारणांनी बाजारातील तयार अन्न खाण्याकडे शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढतो आहे.

डाळवर्गीय पिके ही पर्यावरणपूरक आहेत. कमी पाण्यावर बहुतांश डाळींचे उत्पादन घेतले जाते. हवेतील नायट्रोजन ही पिके घेऊन जमिनीत सोडतात. त्यामुळे पिकांना लागणाऱ्या खताचाही खर्च कमी होतो. जवळपास निम्मीच ऊर्जा वापरली जाते. याउलट मांसाहारातून प्रोटिन मिळवायचे ठरवले तर त्यासाठीचा खर्च अधिक असतो. शिवाय पाण्याचा वापर चौपटीने अधिक होतो. जगभर पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. शाश्वत भविष्यासाठी शाश्वत अन्न म्हणून डाळ खाण्यावर भर देण्याची गरज भासणार आहे.

युरोपीय देशांत डाळींच्या वापरावर भर

मांसाहारापेक्षा शाकाहाराकडे अधिक प्रमाणात जगातील लोक वळत आहेत. त्यातही प्राण्यापासून मिळणारे दूध, दही, लोणी हे न खाणाराही एक वर्ग आहे. तो वर्ग सोयाबीनचे दूध, सोयाबीनचे पनीर याचा वापर करणे पसंत करतो. बर्गरमध्ये मांसाचा समावेश असू नये अशी मागणीही आता वाढू लागली आहे. त्यामुळे बर्गरमध्ये डाळीचा वापर करता येईल का, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पास्त्यात डाळीचा वापर सुरू झालेला आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांत डाळींचा वापर दररोजच्या अन्नात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकांना अधिक चवीचे व पौष्टिक अन्न देण्याकडे तेथील लोकांचा कल आहे. त्यानुसार तेथे मेहनत घेतली जाते.

झाले काय? : तूर, मसूर, हरभरा, उडीद, मूग, वाटाणा हे आपल्याकडील डाळीचे मुख्य प्रकार आहेत. जगात डाळीचे सर्वाधिक उत्पादन भारतात घेतले जाते व त्याचा खपही भारतातच आहे. तीन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे व विविध कारणांमुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्याने डाळींचे भाव गगनाला भिडले होते. तूर डाळीचा भाव किलोला २५० रुपये इतका होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या आवाहनाने देशातील शेतकऱ्यांनी डाळीच्या उत्पादनाकडे मोर्चा वळवत डाळीत देश जवळपास स्वयंपूर्ण केला. मात्र त्याचा फटका शेतकऱ्यालाच बसला. डाळीचे भाव पडले. सध्या तूर डाळीचा भाव १०० रुपये किलो इतका कमी असूनही त्याची विक्री मात्र म्हणावी तशी होत नाही.

केंद्र सरकारने डाळींचे देशांतर्गत होणारे उत्पादन लक्षात घेऊन विदेशातून आयात होणऱ्या डाळींवर घातलेले र्निबध अतिशय योग्य आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कमी गुणवत्तेचा माल येत नाही. आता देशांतर्गत मालाला चांगले भाव मिळावेत, शेतकऱ्याने सातत्याने डाळीचे उत्पादन घ्यावे, असे धोरण राबवले पाहिजे. आपल्याकडील डाळीला विदेशात मानाचे स्थान मिळावे यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवण्याची गरज आहे.

–  हुकूमचंद कलंत्री, अध्यक्ष, लातूर दालमिल असोसिएशन