लहानपणी शरद पवार साहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे अशी भावना शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताना अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का असल्याचं असंच मानलं जातं आहे.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, ‘अनेकांना हा प्रश्न पडला असेल की आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे’.

शिवसेनेचे सुसंस्कृत नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. मात्र आता आनंद होत आहे की, लहानपणी ज्या शरद पवार साहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंडपणे सुरु राहणार आहे असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.