|| निखील मेस्त्री

लाखोंचा खर्च वाया; शासकीय निधीचा अपहार झाल्याची शक्यता

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वछता विभागामार्फत जिल्ह्यातील ४०० ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सॅनिटरी पॅड विल्हेवाट लावणारी यंत्रे (इनसिनेटर मशीन) विनावापर पडून राहिल्या आहेत. त्यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक किमतीत यंत्र खरेदी केल्याने शासकीय निधीत अपहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक बँक अर्थसाहाय्यित निधी अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागाने गेल्यावर्षी २६ लाख ७८ हजार ४०० रुपये खर्च करून पालघर जिल्ह्यासाठी ही यंत्रे मागवली होती.  पालघर जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये ४७३ ग्रामपंचायतींमध्ये  ही यंत्रणा बसवण्यात येणार होती. मात्र करोनाकाळ असल्यामुळे चारशे ग्रामपंचायतींमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली, तर ७३ ठिकाणी अजूनही ती बसवण्यात आलेली नाही. औरंगाबाद येथील एका कंपनीकडून या

यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. या एका यंत्राची किंमत सहा हजार सातशे रुपये इतकी आहे. पाणी व स्वच्छता विभागाने शासनाच्या जेम पोर्टल वरून ही यंत्रणा खरेदी केली असली तरी खुल्या बाजारात हिची यंत्र आणखीन स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे  शासकीय निधीचा अपहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  शासनमान्य जेम पोर्टलचे नाव पुढे करून ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचे हा विभाग सांगत आहे.

ही यंत्र ग्रामपंचायत व इतर ठिकाणी बसवली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले असले तरी काही ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबरीने ही यंत्रणा  सार्वजनिक ठिकाणी बसविल्याने महिलांना त्याचा वापर करता येणे शक्य नाही. परिणामी ती विनावापर पडून आहे.  विशेषत: ज्या कंपनीमार्फत ही यंत्रणा खरेदी केली गेली, त्या कंपनीचे नावही त्या यंत्रांवर नसल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत यंत्रणेने हे यंत्र मिळाल्याचे पत्र पाणी स्वच्छता विभागाला लिहिले असले तरी प्रत्यक्षात हे यंत्र कोणत्या तारखेला घेतले त्या तारखाच त्या पत्रात नमूद नसल्याचे दिसते.  ही यंत्र बसवल्यानंतर ती कार्यान्वित आहे किंवा नाही व ती कार्यान्वित करण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाने विशेष लक्ष पुरवणे अपेक्षित होते, यासाठीचे सर्वेक्षण करणेही गरजेचे होते, मात्र तसेच झाले नसल्याचे येथे सांगितले जाते.

या यंत्रांचा वापर करण्याअनुषंगाने पंचायत समिती स्तरावर सूचना देण्यात येतील. पंचायत समिती स्तरावरून आलेल्या माहितीनुसार  ही यंत्रे पुरविण्यात आलेली आहेत. -तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग

 

लाखो रुपये खर्च करून  यंत्र खरेदी केली असतील तर त्याच्या वापरासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र,तसे केलेले नाही त्यामुळे ही यंत्रे खरेदी करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला असेच म्हणता येईल. – सुरेखा थेतले, विरोधी पक्षनेत्या, जि. प. पालघर

 

उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा स्थानिक पातळीवरील खासगी बचत गट यांच्यामार्फत अशी जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते. मात्र संबंधित विभागाने खर्च करून ती यंत्रणा विनावापर पडून असेल तर काय साध्य केले हा संशोधनाचा भाग आहे. – ज्योती ठाकरे, अध्यक्ष ,महिला आर्थिक विकास महामंडळ