News Flash

लसटंचाई!

पालघर जिल्ह्याात दररोज सुमारे साडेपाच हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे.

पालघर जिल्ह्यातला लशीचा साठा आज संपुष्टात; वसई-विरार पालिकेकडेही केवळ तीन दिवसांपुरता साठा

पालघर/ वसई : करोना प्रचंड वेगाने पसरू लागल्याने धास्तावलेले नागरिक लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करत असताना पालघर जिल्ह्याातील लशींचा साठा शुक्रवारी संपण्याची चिन्हे आहेत तर, वसई-विरार महापालिकेकडेही जेमतेम तीन दिवस पुरतील इतक्याच लशीच्या कुप्या शिल्लक आहेत. परिणामी गुरुवारी जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी आणि लशीचा तुटवडा हे चित्र दिसून आले. यातून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर वादविवाद, गोंधळ निर्माण झाला होता. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरात असून मुंबई, ठाणे या नजीकच्या महानगरांत तर अनेक ठिकाणी गुरुवारीच लसीकरण थांबवण्यात आले.

पालघर जिल्ह्याात दररोज सुमारे साडेपाच हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, आता लसटंचाई निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात बुधवारपर्यंत लसीकरण केंद्रांमध्ये १२३६० कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध होता. हा साठा शुक्रवारपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोवॅक्सिनचा मर्यादित साठा आला होता. त्यापैकी १२०० नागरिकांना दुसऱ्या लसीकरणासाठी उर्वरित साठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील केंद्रीय जिल्हा औषध भंडारामध्ये गुरुवारपर्यंत एकही लशीचा साठा शिल्लक नव्हता. ज्या लसीकरण केंद्रांमध्ये साठा उपलब्ध आहे तो शुक्रवारपर्यंत पुरेल अशी स्थिती आहे. त्यानंतर लसीकरण केंद्रे साठा येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

लस संपत असल्याचे समजताच गुरुवारी लसीकरणासाठी धाव घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. लसीकरण केंद्रामध्ये दिवसाला शंभर ते दोनशे नागरिकांना सरासरी लस दिली जात असताना काही ठिकाणी ३०० पेक्षा अधिक नागरिक आल्याचे चित्र पालघर, बोईसरसह अनेक ठिकाणी दिसून आले. त्यामुळे आणखी गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, साठ्याच्या क्षमतेनुसार केवळ दीडशे जणांनाच टोकन वाटण्यात आल्याने उर्वरित नागरिकांना चार-पाच तास रांगेत काढल्यानंतर रिकाम्या हाती घरी परतावे लागले. वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यात देखील एक दिवसाच्या लसीकरणाचा साठा उपलब्ध असून ग्रामीण भागात शुक्रवार व शनिवारी लसीकरण होत असल्याने शुक्रवारी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

खासगी रुग्णालयांतील केंदे्र बंद

वसई, विरार शहरांतही लशीचा तुटवडा असून पालिकेकडे शनिवारपर्यंत पुरतील इतक्याच कुप्या शिल्लक आहेत. खासगी रुग्णालयांना देण्यात आलेला लशीचा साठा यापूर्वीच संपल्याने काही ठिकाणची केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे साठा कमी असताना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी वाढल्याने पालिकेने दुसऱ्या फेरीतील लसीकरणासाठी जतन करून ठेवलेला ‘कोव्हॅक्सिन’चा साठाही सर्व लसीकरण केंद्रांवर वाटला.

वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पण लस साठा नसल्याने लसीकरणाला गती देता येत नसल्याची खंतसुद्धा पालिकेने व्यक्त केली आहे. ‘अजूनही पालिकेने कोणतेही लसीकरण केंद्र बंद केले नाही. पण लस नसल्याने काही ठिकाणी तूर्तास विराम दिला आहे. लस जसजशी उपलब्ध होत आहे तसतसे आम्ही त्याचे वितरण करत आहोत,’ असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले.

मुंबई

मुंबईत गुरुवारपासून लसटंचाई निर्माण झाली आहे. मुंबईतील ११८ केंद्रांपैकी जवळपास २७ केंद्रे गुरुवारी लशीच्या कुप्या उपलब्ध न झाल्याने बंद ठेवावी लागली. तर अन्य केंद्रांवरही जेमतेम दिवस-दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे.

नवी मुंबई

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गुरुवारपर्यंत केवळ लशीचा साठा जेमतेम तीन हजार इतकाच होता. हा साठाही दिवसभरात वापरात आल्यामुळे आज, शुक्रवारी  शहरातील लसीकरण लशीअभावी बंद पडण्याची शक्यता आहे.

ठाणे

जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानंतर स्थानिक प्रशासनाने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असला तरी सद्य:स्थितीत जिल्ह्यात १ लाख २३ हजार ८४० इतकाच लशीचा साठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहरात दोन दिवस आणि ग्रामीण भागात पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:04 am

Web Title: vaccine stocks in palghar district depleted today akp 94
Next Stories
1 गृह विलगीकरणातूनही प्रसार
2 पालिकेच्या लसीकरण केंद्राचे श्रेय लाटण्याचा भाजपचा डाव?
3 कापसाने भरलेला ट्रक खाक
Just Now!
X