News Flash

बारावीत दोनदा नापास झाला पण लढत राहिला अन् PSI च्या परीक्षेत थेट राज्यातून पहिला आला

आईने संपूर्ण गावाला वाटले पेढे; मित्रांनी काढली मिरवणूक

दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे टप्पे असतात असं सांगितलं जातं. अनेकदा या परिक्षांमध्ये चांगले गुण मिळवणारे विद्यार्थ्यी भविष्यात यशस्वी होतात असंही म्हटलं जातं. मात्र करमाळा येथे दोनदा बारावी नापास झालेल्या मुलाने थेट राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये राज्यात पहिला येण्याची कमाल करुन दाखवली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेमध्ये करमाळ्याचा वैभव नवले राज्यातून प्रथम आला आहे. वैभवने दुसऱ्यांदा ही परीक्षा दिली होती. मागील वर्षी अवघ्या एका गुणामुळे त्याची संधी हुकली होती. यंदा मात्र त्याने थेट पहिला क्रमांक पटकावल्याने करमाळ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वैभव हा सर्व सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील करमाळा आगारमध्ये क्लार्क पदावर कार्यरत होते. घरातील कर्त्या पुरुषाच्या नोकरीसाठी नवले कुटुंब करमाळ्यामध्ये काही दशकांपूर्वी स्थायिक झालं. वैभवने आपले शिक्षण येथील नगरपरिषदेच्या मराठी शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयामधून त्याने विज्ञान शाखेतून अकरावी आणि बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासामध्ये सर्वसाधारण असणारा वैभव २००९ आणि २०१० अशा सलग दोन वर्ष बारावीच्या परिक्षेत अपयशी ठरला. दोन्ही वेळेस वैभवचे चार विषय राहिले. मात्र अपयशामुळे खचून न जाता वैभवने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कला शाखेतून प्रवेश घेतला आणि आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्याचवेळी वैभवचा मित्र कृनाल घोलप लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी पुण्याला जाणार होता. तेव्हा वैभवनेही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या आणि मित्रांच्या मदतीने वैभव पुढील शिक्षणासाठी २०१६ साली पुण्यात आला. लोकसेवा आय़ोगाची परीक्षा देण्याचे कुणालने ठरवले. त्यासाठी त्याने काही शिबिरांना हजेरी लावली. कोणताही क्लास न लावता केवळ मित्रांनी केलेली मदत आणि अभ्यासाच्या जोरावर परीक्षा देण्याचं वैभवने ठरवले.

२०१६ साली वैभव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रच लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परिक्षेचा निकाल २०१८ साली लागला. त्यावेळेस वैभवचा मित्र कृनाल उत्तीर्ण झाला. वैभवची संधी मात्र अवघ्या एका गुणाने हुकली. करमाळ्यामधून त्यावर्षी आठजण उत्तीर्ण झाले. मात्र वैभवची संधी एका गुणाने हुकल्याने कोणीच आनंद साजरा केला नाही. मात्र जिथे जिथे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार झाले तिथे त्यांनी वैभवलाही सोबत नेलं. त्यामुळे पुन्हा परीक्षा देण्याची ऊर्जा वैभवला मिळाली. कठीण काळामध्ये वैभवचे आई-वडीलही त्याच्या मागे उभे राहिले. वैभवने पुन्हा एकदा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि तो थेट नंबरात आला. वैभव राज्यातून पहिला आल्याची बातमी समजल्यानंतर त्याच्या आई-वडीलांचा आणि मित्रमैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. वैभवच्या आईने तर संपूर्ण गावात ‘माझा भैया जिंकला’ म्हणत पेढे वाटले. वैभवच्या मित्रांनी गुलाल उधळत गावातून त्याची मिरवणूक काढली. घराजवळ आईने औक्षण करुन मिरवणूक संपवण्यात आली.

आपल्या यशाबद्दल बोलताना वैभवने मी दररोज चार ते पास तास नियमीत अभ्यास करायचो असं सांगितलं. “पुण्यातून करमाळ्याला आल्यावर मी निवांत व्हायचो. पहिल्या प्रयत्नात एका गुणामुळे संधी हुकल्याने मी निराश झालो नाही. त्या अनुभवातून मी बरंच काही शिकलो. दुसऱ्यांदा परीक्षा देण्यासाठी माझ्या आई-वडीलांनी आणि कृनालने मला खूप मोठा आधार दिला,” अशा शब्दात वैभवने घरच्यांचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:50 pm

Web Title: vaibhav navle the boy ho failed 2 times in hsc comes first in psi maharashtra exam scsg 91
Next Stories
1 भाजपा सरकारच्या काळातील ‘या’ नियुक्त्या ठाकरे सरकारने केल्या रद्द
2 परदेशातील व्यक्तींचा पळवाटांनी महाराष्ट्रात प्रवेश; आरोग्यमंत्र्यांकडून धक्कादायक माहिती
3 Coronavirus: “महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो; डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी खरे हिरो”
Just Now!
X