माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा धर्मनिरपेक्षता हा पाया आहे. वंचित बहुजन आघाडी जातीयवादी शक्तींबरोबर गेली आहे. हे कुठल्या तत्वात बसते, असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर त्यांनी निशाणा साधला आहे.

सोलापूर येथे माध्यमांशी ते बोलत होते. शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मतदारसंघातून उभारणार असल्याचे गत आठवड्यात जाहीर केले आहे. आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे शिंदे हे अडचणीत आले आहेत. भाजपाचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असताना शिंदेंना ही निवडणूक सोपी जाईल असे वाटत होते. मात्र, आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे शिंदेंसमोर सध्या नवीन अडचण निर्माण झाली आहे.

शिंदे यांनी यावेळी मोदी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक मुद्दे निर्माण झाले आहेत. चीनच्या प्रकरणात मोठी नामुष्की ओढावून घेतली. काश्मीरचा प्रश्न भाजपावाल्यांना हाताळताच आलेला नसून जवानांचा नाहक बळी जात असल्याचे त्यांनी म्हटले.

माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी अचानक माघार घेतल्याबाबत विचारले असता, राजकारणात असे होत असते. प्रत्येकाच्या सोई, व अॅडजेस्टमेंटचा प्रश्न असल्याने त्यात फार काही विशेष वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरातील काही आघाडीचे काही नेतेमंडळी भाजपाच्या गळाला लागत असल्याबाबत विचारले असता, अनेक वर्षापासून सगळे पाहतोय, ऐन निवडणूक लागली की पळापळ होते, पुन्हा काहीजण माघारी येतात, त्यामुळे त्याबाबत गांभीर्याने आम्ही व तेही घेत नाही.