दिगंबर शिंदे

सांगलीच्या पाटीलवाडय़ावरून तिसऱ्या पिढीतील प्रतीक पाटील यांनी अखेर आजपर्यंत ज्या काँग्रेसने भरभरून दिले त्याच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत यापुढील वेळ समाजकारणासाठी असे जाहीर केले. हे करीत असताना आपल्या घरातील दुसरा वारसदार विशाल पाटील यांच्या राजकीय प्रवासातील अडसर आपोआप दूर होत असल्याचेही जाहीर केले. वसंतदादांची तिसरी पिढी या टोकाला का पोहचली याची उत्तरे शोधायला गेले तर जे आजअखेर पेरले तेच उगवले असेच म्हणावे लागेल.

राज्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांनीही पक्षात अन्याय होत असल्याचे दिसताच राजकारण संन्यास घेत सांगली गाठली होती. मात्र वेळ येताच पुन्हा काँग्रेस जळत असताना मी घरी थांबू का, असा सवाल करीत पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. आता त्यांचे नातू प्रतीक पाटील यांना राजकारण संन्यास घेण्याची वेळ आली ती केवळ हतबलतेतूनच आली आहे. सांगलीच्या लोकसभेसाठी प्रतीक पाटील यांना प्राधान्य होते, मात्र त्यांचा संपर्क उरलेला नव्हता.

सांगलीतील काँग्रेसच्या आणि वसंतदादा कुटुंबाच्या अधोगतीला पुढची पिढीच जबाबदार आहे. दादांनी सुरू केलेली एकही संस्था नीट चालत नाही, वसंतदादा यांचे संघटन, लोकांशी नाते पुढच्या पिढीला जपता आले नाही.  सत्तास्थाने देऊनही काँग्रेस बळकट करता आली नाही.