उत्पादक शेतकरी आणि ग्राहकाची थेट भेट घडवून दोघांसाठीही लाभदायी ठरलेल्या राजवाडी भाजी उपक्रमाने दुसऱ्या वर्षांत पदार्पण केले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला रत्नागिरीतील ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या या अभिनव उपक्रमाला गेल्या वर्षी ८ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. ग्राहकांशी प्रभावी आणि थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपवर राजवाडी भाजी याच नावाचा ग्रुप तयार करण्यात आला. त्यावर राजवाडीत उपलब्ध भाज्यांची सचित्र माहिती देऊन मागणी नोंदविण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात आले. सुरुवातीला या ग्रुपवर अवघे ४०-५० सदस्य होते. पण अल्प काळात ही संख्या अडीचशेवर जाऊन पोहोचल्याने दुसरा ग्रुप स्थापन करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिल्या महिन्यात केवळ माठ, पालक व मुळा या तीन पालेभाज्या देण्यात आल्या. मात्र उत्पादन वाढल्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार भाज्यांची संख्या आणि प्रमाणही झपाटय़ाने वाढत गेले. रत्नागिरी शहरातील शेटय़े न्यूजपेपर स्टॉल (जयस्तंभ), निर्लेप ऑनलाइन (सोहम ऑर्केड), खेर यांचे दुकान (टिळक आळी), व्ही. जी. फ्रोजन फूडस (सावरकर नाटय़गृहाशेजारी) आणि नंतर वस्तू भांडार (साळवी स्टॉप शेजारी) या पाच ठिकाणी आठवडय़ातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस संध्याकाळी या भाज्या उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. नोकरदार महिलांची गरज लक्षात घेऊन त्यापैकी काही भाज्या धुवून, चिरून पाकीटबंद करून दिल्या जात असल्याने चोखंदळ रत्नागिरीकरांचा प्रतिसाद वाढत गेला. शेटय़े न्यूजपेपर स्टॉलचे संचालक अभिजीत शेटय़े या भाज्यांची संबंधित विक्री केंद्रांवर  वेळेत आणि बिनचूक वितरणाची जबाबदारी अतिशय उत्तमप्रकारे पार पाडत राहिले. मात्र नोंदणी आणि वितरणाच्या जास्त परिणामकारक कामासाठी रत्नागिरीतील गद्रे इन्फोटेक कंपनीतर्फे खास अ‍ॅप तयार करून देण्यात आले. त्यामुळे गतवर्षी २१ एप्रिलपासून सर्वप्रकारच्या भाज्यांची मागणी या अ‍ॅपद्वारे केली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात भेंडी, गवार, वांगी, दुधीभोपळा, लांबडा भोपळा, सिमला मिर्ची, कारली इत्यादी फळभाज्या, सुरण, घोरकंद, कारिंदे इत्यादी कंदपिके, पपई, केळी, शहाळी, चिबूड, आवळा, काकडी इत्यादी फळे, चवळी, मूग, उडीद इत्यादी कडधान्ये, भारंगी, फोडशी, टाकळा इत्यादी रानभाज्या, त्याचबरोबर तीन रंगातील शेवंती, झेंडू आणि ऑर्कीडची फुलेही या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. सणासुदीच्या काळात हळद, चवई आणि अळुची पाने, फणसाचे कच्चे, पिके गरे, शिजविलेली कुयरी, आठला, भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे ही या उपक्रमातील काही खास वैशिष्टय़े राहिली.

सुरुवातीला केवळ राजवाडी आणि धामणी या दोन गावातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्यापुरता मर्यादित असलेल्या या उपक्रमामध्ये गेल्या वर्षभरात नायशी, असुर्डे, डिंगणी, सावर्डे, चरवेली, फुणगूस इत्यादी ठिकाणचे शेतकरीही सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षभरात अति पावसामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर हे दोन महिने वगळता दहा महिने अखंडीतपणे हा उपक्रम चालू राहिला. त्यातून विविध प्रकारच्या एकूण सुमारे साडेतीन टन भाज्यांची विक्री करण्यात आली. त्यातून सुमारे पावणेतीन लाख रुपयांची उलाढाल झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा आणि रत्नागिरीतील विक्री केंद्राचे विनामोबदला सहकार्य यामुळे शेतकऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात आर्थिक फायदा झाला आहे.

गेल्या वर्षभरात या भाज्यांसाठी ग्राहकांची संख्या सुमारे साडेसातशेवर पोहोचली असून या वर्षांत उपक्रमाच्या आणखी काही विस्तार योजना आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांबरोबरच शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचाही यामध्ये सहभाग राहणार आहे.