News Flash

अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला शोक; म्हणाले,…

ठाण्यातील राहत्या घरी रविवारी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे काम केले. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांची बबड्याचे आजोबा ही भूमिका चांगलीच गाजली. रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

“रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो; रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

“वयाची ८० वर्षे पार करूनही त्यांनी अविरत काम केले. रवी पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत. एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. सिने-नाट्य सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले”, असं भावनिक मत त्यांनी व्यक्त केलं.

भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायक अशा भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांत पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला ‘वस्ताद पाटील’ प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहील. सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात काम केलं. १९४४ मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष बालगंधर्व तर स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे होते. अरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२व्या वर्षीही ते या नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 11:15 am

Web Title: veteran marathi actor ravi patwardhan passes away maharashtra cm uddhav thackeray pays emotional tribute vjb 91
Next Stories
1 शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले,”…तर हे दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही”
2 ‘वस्ताद पाटील’ काळाच्या पडद्याआड, रवी पटवर्धन यांच निधन
3 याचा अर्थ असा की, कायदा आणि न्यायव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण; संजय राऊत यांचा आरोप
Just Now!
X