13 July 2020

News Flash

विधानसभा निवडणूक लढवणार नाही- इंदोरीकर महाराज

इंदोरीकर महाराज व मंत्री विखे यांच्या खुलाशामुळे  इंदुरीकर महाराज  विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना आता होणार नाही. 

(संग्रहित छायाचित्र)

‘ते काम आपलं नाही, ते जमणारही नाही ‘ असे समाजप्रबोधन कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी सांगत राजकारणात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

महाजनादेश यात्रेनिमित्त संगमनेर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला  इंदुरीकर महाराज उपस्थित होते, त्यामुळे ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार ,संगमनेर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढविणार अशी चर्चा समाजमाध्यमावर सुरु झाली. त्यासंदर्भात संपर्क साधला असता इंदोरीकर महाराज यांनी या वृत्ताचा इन्कार केला.

पूरग्रस्तांच्या मदतीचा एक लाख रुपयांचा धनादेश देण्यासाठी आपण संगमनेर येथील सभेत  मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो. त्यामागे राजकीय हेतू नव्हता असे ते म्हणाले. ते आपल्याला जमणार नाही, ते कामही आपले नाही. माध्यमातून चुकीचे वृत्त आले .त्यात तथ्य नाही, असेही  इंदुरीकर महाराज  यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. इंदुरीकर महाराज आमदारकीचं तिकीट घेणार नाहीत. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. कोल्हापूर—सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून १ लाख रुपये देण्यासाठी महाराज तिथं गेले होते,असं इंदुरीकरांचे सहायक किरण महाराज शेटे यांनी सांगितले.

तर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाविषयी गृहनिर्माण मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी  एका वृत्तसंस्थेला सांगितलं,की आमदारकीबाबत आमची कोणतीही चर्चा महाराजांशी झालेली नाही. मुख्यमंत्री सहायता निधीस पैसे देण्यासाठी ते उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाची राजकीय चर्चा आमच्यात झालेली नाही.

इंदोरीकर महाराज व मंत्री विखे यांच्या खुलाशामुळे  इंदुरीकर महाराज  विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना आता होणार नाही.

भाजप उमेदवाराच्या शोधात?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपला अद्याप उमेदवार सापडलेला नाही. मंत्री  राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांनी  निवडणूक लढवावी, अशी चर्चा होती, पण त्यातून पुढे काही निष्पन्न झालं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 2:59 am

Web Title: vidhan sabha will not contest elections indorekar maharaj abn 97
Next Stories
1 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे २४३ मूर्तीचे पुन्हा विसर्जन
2 बिहारच्या हरविलेल्या बालकाची चंद्रपुरात आई-वडिलांशी भेट
3 उदयनराजेंच्या प्रवेशाचे साताऱ्यात स्वागत
Just Now!
X