अशोक तुपे

मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभा निकालानंतर नगर जिल्ह्य़ाच्या भाजपच्या राजकारणात एकाकी पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्य़ात भाजपच्या केवळ तीन जागा निवडून आल्याने सर्व बारा जागा निवडून आणण्याची त्यांची वल्गनाच फोल ठरली. त्यातच पराभूत उमेदवारांनी विखे यांच्यावर खापर फोडले आहे.

लोकसभा निवडणुकीत मुलासाठी जागा सोडण्यास नकार दिल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपचा मार्ग पत्करला. विरोधी पक्षनेता आणि सहकार चळवळीतील बडा मासा गळाला लागल्याने भाजपमध्ये त्यांचे कोडकौतुक झाले. मंत्रिमंडळात प्रवेश देऊन त्यांच्याकडे गृहनिर्माण हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले.

विखे स्वत: तसेच मोनिका राजळे व बबनराव पाचपुते हे तीन भाजपाचे आमदार निवडून आले. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीला  यश मिळाले. निवडणुकीत पालकमंत्री राम िशदे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड हे पाच माजी आमदार पराभूत झाले. पिचड यांना विखे यांनी भाजपात आणले. मात्र त्यांनाही ते निवडून आणू शकले नाहीत.

विखे यांनी पक्षाचे काम केले नाही.  काही ठिकाणी त्यांनी पक्षाच्या विरोधी काम केले, अशी तक्रार पिचड वगळता सर्व माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे यांच्यासह अनेक नेत्यांकडे केल्या आहेत.

एकूणच निवडणूक काळात विखे यांच्याबद्दल वेगवगेळ्या चर्चा सुरू होत्या. निकालानंतर भाजपाचे उमेदवार विखे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला विखे गेले असता त्यांच्यासोबत केवळ त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे हे होते. भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी विखे यांची साथ सोडल्याने आता ते एकाकी पडले आहेत.

नातेवाईक विरोधकांच्या प्रचारात

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला. तसेच नेवासे विधानसभा मतदारसंघात विखे यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक हे अपक्ष उमेदवार शंकर गडाख यांच्या प्रचारात होते.

मंत्री पंकजा मुंडे यांनी आदेश देऊनही विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांनी सभा घेतली नाही. त्यामुळे मुरकुटे यांच्या विरोधात विखे आहेत असा संदेश गेला. त्यामुळे मुरकुटे यांच्या पराभवाला हातभार लागला. कर्डिले यांच्या राहुरी मतदारसंघात विखे यांचे समर्थक व नातेवाईक हे उघडपणे राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारात सक्रिय होते. पालकमंत्री राम िशदे यांनाही विखे यांची मदत झाली नाही.

स्वपक्षीयांचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात असलेला पक्षांतर्गत विरोध विखे यांनी अनुभवला. पण आता भारतीय जनता पक्षात त्यांना विरोध सुरू झाला असून, ते हा विरोध पहिल्यांदाच अनुभवत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना युतीच्या पाचही आमदारांनी मदत केली होती. त्यांच्या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. विखे यांच्या पक्षप्रवेशाला आमदारांनी विरोध केला नव्हता. मात्र विखे यांच्यामुळेच पराभव झाला, असे पाचही आमदारांचे म्हणणे आहे. पराभूत पालकमंत्री राम शिंदे व शिवाजी कर्डिले यांनी विखे यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षात मोहीम उघडली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकली जात आहेत. त्यामुळे विखे एकाकी पडले आहेत.

सेनेलाही विखेंचा फायदा नाही

विखे यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, पारनेरचे सभापती राहुल झावरे व नंदकुमार झावरे, बाळासाहेब हराळ, हे विरोधात गेले होते. शिवसेनेचे नगरचे उमेदवार अनिल राठोड व पारनेरचे उमेदवार विजय औटी यांनाही विखे यांचा फायदा झाला नाही. निवडणूक काळात विखे हे शांत होते. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सभा घेतल्या तरी त्यांच्या वक्तव्याने भाजपाच्या उमेदवारांचीच अडचण झाली.