माझे वडील मुख्यमंत्री, आमदार, खासदार नव्हते. मी सामान्य कुटुंबातून आलोय. लोकांनी मला निवडून दिले. मला अनेक सन्मानाची पदे मिळाली. पक्षाचे त्यात योगदान आहे. त्यामुळे विखे परिवाराने मला आव्हान देऊ  नये, असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एकतरी उदाहरण दाखवा, असे आव्हान खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिले होते. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर माजी मंत्री शिंदे यांनी विखे यांच्यावर हल्ला चढविला. भाजपा संघटनात्मक पातळीवर कमी पडलेला आहे. पराभवाची कारणे शोधणारा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. त्यामध्ये सर्वकाही स्पष्ट होईल. पक्ष हा काही कोणाची बापजाद्याची इस्टेट नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही कर्तृत्वाने पुढे आलो आहोत . जनतेने आम्हाला निवडून दिले.  आम्हाला जनाधार होता, त्यामुळे त्यांनी आम्हालाआव्हान देण्याचे काहीच कारण नाही, आणि त्यांनी देऊ  नये, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. आमचा पराभव झाला, निवडणुकीमध्ये कुणीही पराभवासाठी नाही,तर जिंकण्यासाठी निवडणूक लढवतो. त्यामुळे अहवाल आल्यानंतर सर्व बाबी या स्पष्ट होतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी,कर्जत—जामखेडचा  विकास झालाच नाही, असे केलेले वक्तव्य चुकीचे आहे. मी केवळ पुस्तकातच नाही, तर प्रत्यक्षात विकास करून दाखवला .हा विकास करताना विरोधकांनासुद्धा मी सोबत घेतलं होतं. मला माझ्याच मतदारसंघात विरोधक शिल्लक राहिला नाही, म्हणूनच रोहित पवार यांनी माझा मतदार संघ निवडला असावा, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. निदान आता तरी जनतेला पवार यांनी दिलेली आश्वासनं  पूर्ण करून दाखवावीत , असे आवाहन शिंदे यांनी या वेळी केले.

नगर जिल्हा विभाजनाचा विषय मी ज्या पद्धतीने हाती घेतला , तो आगामी काळामध्ये सुद्धा सुरू राहील. जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रही राहणार आहे . आमच्या कार्यकाळात हे विभाजन होऊ  शकले नाही , हे जरी खरे असले तरी निवडणुकीच्या तोंडावर सात जिल्ह्यंचे विभाजन करावे , असा विषय होता.  त्यामध्ये नाशिक, बीड , ठाणे आदी जिल्ह्यंचा समावेश होता. निवडणुकीच्या तोंडावर जर विभाजन झाले असते,  तर त्याचा वेगळा संदेश गेला असता. त्यामुळे तो विषय प्रलंबित राहिला.  जिल्हा विभाजन झाल्यावर नगरचे मुख्यालय हे नगर आहे , उत्तरेचे मुख्यालय कुठे करायचे,  हा राज्य शासनाचा विषय आहे. त्याबाबत सरकार निर्णय घेईल , अशी स्पष्टोक्ती त्यांनी देऊ न जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रह धरणार असल्याचे  सांगितले.महाआघाडीचे सरकार स्थापन होऊ न आता सव्वाशे दिवस झाले आहेत . मात्र अद्यापही नगरला पालकमंत्री आले नाहीत. पालकमंत्री येण्यास उशीर झाल्यामुळे जिल्ह्यतील अनेक बैठका या होऊ  शकल्या नाहीत असेही ते म्हणाले.

मोठय़ा घराण्याबरोबर लढत दिली

माझी लढाई मोठय़ा घरणासोबत होती . वास्तविक पाहता पाच ते सहा ठिकाणी रोहित पवार यांना उमेदवारीला विरोध झाला. त्यांना कुणी शिरकाव करून दिला नाही. मात्र या ठिकाणी त्यांना स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवार कोणी मिळाला नाही, त्याचा फायदा घेऊ न साम- दाम- दंड यांचा वापर केला व निवडणूक जिंकली, असा आरोपही माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी या वेळी केला.