गडचिरोली जिल्ह्य़ातील गुढीपाडव्याला नेलगुंडा, मीडदापली, गोंगवाडा, पेनगुंडा या चार गावातील २०० ते २५० ग्रामस्थांनी एकत्र येत नक्षलवाद्यांचे स्मारक उध्वस्त केले व नक्षलवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही, अशी शपथ घेतली. ग्रामस्थांच्या  एकजुटीमुळे दुर्गम भागात नक्षलवाद्यांचा संपर्क तुटत चालला आहे.

छत्तीसगड व तेलंगना राज्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला असतांनाच गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा, मौजा मीडदापली, मौजा गोंगवाडा, मौजा पेनगुंडा या चार गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी बळजबरीने बांधलेली स्मारके उदध्वस्त केली.  बांधकामाच्या वेळीही गावकऱ्यांनी स्मारकांना विरोध केला होता हे येथे उल्लेखनीय. नक्षलवाद्यांमुळे या भागाचा विकस झाला नाही.

तो करायचा असेल तर यापुढे आपण नक्षलवाद्यांना मदत करता कामा नये, अशी भावना येथे एकत्र आलेल्या २०० ते २५० आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी गावकऱ्यांच्या मनात नक्षलवाद्यांप्रती मोठा असंतोष दिसून आला. हाच असंतोष नक्षलवाद्यांची अतिदुर्गम भागातील नाळ तोडण्यात कामी येत आहे.

दरम्यान या चार गावातून सुरू झालेली ही नक्षली स्मारक उध्वस्त करण्याची मोहीम येत्या काळात एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, कोरची व धानोरा या नक्षलवादांच्य दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील असलेल्या तालुक्यातील गावांमध्ये सुध्दा बघायला मिळणार आहे.