कपिल आणि धीरज वधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील २३ जणांना सातारा प्रशासनाने आज महाबळेश्वर येथील वधवान हाऊस येथे क्वारंटाइन केलं. पाचगणी येथून पोलीस बंदोबस्तात या सर्वांची रवानगी महाबळेश्वर येथे करण्यात आली. दरम्यान, यांची गृहमंत्रालयातील विशेष आदेशान्वये संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी देखील करण्यात येणार आहे.

लॉकडाउनच्या काळात संचारबंदी आणि जिल्हा प्रवेश बंदीचे आदेश असतानाही वाधवान कुटुंबियांनी हा आदेश मोडत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे तीन जिल्ह्यातून प्रवास करीत वाधवान कुटुंबातील २३ सदस्य आठ एप्रिल रोजी महाबळेश्वरात मुक्कामी दाखल झाले होते.

त्यानंतर नऊ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशावरून वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर-चौगुले यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात वधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना पाचगणतील सेंट झेविअर्स हायस्कुलमध्ये आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. पाचगणी येथील या सर्वांचा चौदा दिवसांचा आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना ईडी आणि सीबीआयने ताब्यात घ्यावे, असा आदेश साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढला होता.

दरम्यान, कपिल व धीरज वधवान यांचा सातारा प्रशासनाकडून ताबा मिळावा यासाठी बुधवारी (दि.२२) सीबीआयने न्यायालयात अर्ज केला होता. यानंतर न्यायालयाने तीन मे पर्यंत वधवान बंधूंनी सातारा जिल्हा सोडून जाऊ नये असा आदेश दिल्याने सातारा प्रशासनाने आज त्यांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारुन त्यांना महाबळेश्वर येथे त्यांच्या घरीच क्वारंटाइन केले.

“पोलिसांनी वधवान कुटुंबीय व इतरांवर कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यांना जिल्हा सोडून जाऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी सर्वांवर जिल्हाबंदी आदेश मोडून आल्याबद्दल कारवाई केली आहे. त्यातील तिघांना आज चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वांना चौकशीसाठी एकत्र न बोलवता तिघांना बोलावण्यात येणार आहे. तसेच जर त्यांनी तपास कार्यात सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” असं पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं.