विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लगतच्या छत्तीसगड व तेलंगणातून येणारी देशीविदेशी दारू, नक्षलवाद्यांची शस्त्रे, पैसा, तसेच अन्य सामग्री या जिल्ह्य़ात येऊ नये व येथून गडचिरोली व वर्धा जिल्ह्य़ात दारूची तस्करी होऊ नये म्हणून लक्कडकोट, परसोडा येथे आंतरराज्यीय सीमा पोलिस दल, स्टॅस्टीक सव्‍‌र्हेलन्स व उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहे. कॅमेऱ्याचा हा तिसरा डोळा निवडणुकीत पैसा व दारूच्या गैरवापरावर नजर ठेवणार आहे.
या जिल्ह्य़ात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात बल्लारपूर, चंद्रपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी व राजुराचा समावेश आहे. या जिल्ह्य़ालगत गडचिरोली व वर्धा हे संपूर्ण दारूबंदी असलेले दोन जिल्हे आहेत. मात्र, निवडणुकीतील वातावरण दूषित होणे टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी मद्य, पैसा आणि बलाचा उपयोग होऊ नये म्हणून आतापासूनच आंतरराज्यीय व जिल्ह्य़ांतर्गत सीमा सील केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला हळूहळू रंग चढू लागला आहे. विविध पक्षातील नेते, तसेच स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचा दौर सुरू झाल्यानंतर, तसेच मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसा मतदारांना पैसे व दारूचे प्रलोभन देण्यात येते. हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाच्या आदेशावरून लगतच्या तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील लक्कडकोट व परसोडा या दोन नाक्याच्या सीमा सिल केल्या आहेत. तेथे कॅमेरा लावून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे, तसेच वडसा व व्याहाड येथील जिल्ह्य़ांतर्गत सीमा पोलिस दल, स्टॅस्टीक सव्‍‌र्हेलन्स टिम व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त पथकाच्या माध्यमातून सील केली आहे.
या जिल्ह्य़ालगतच्या तेलंगणा व छत्तीसगडमधून मोठय़ा प्रमाणात पैसा व देशीविदेशी दारूची आयात होते. येथूनही छत्तीसगड व तेलंगणात देशीविदेशी दारू पाठविली जाते. केवळ या दोन राज्यातच नाही, तर चंद्रपूरलगतच्या वर्धा व गडचिरोली जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ातून वर्धा व गडचिरोलीत मोठय़ा प्रमाणात दारूची तस्करी होते. मतदारांना आमिष दाखविण्यासाठी होणाऱ्या या तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून सीमा सील करण्यात आल्या आहेत, तसेच उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीसाठी खास सहा भरारी पथके गठीत केली आहेत. ही पथके जिल्हाभर फिरून तस्करीवर लक्ष ठेवणार आहे. लक्कडकोट, परसोडा, गोंडपिंपरी, मेंडकी, ब्रम्हपुरी, व्याहाड, घुग्घुस या मार्गाने मोठय़ा प्रमाणात गडचिरोली व वर्धा जिल्ह्य़ात तस्करी होते. त्यामुळे ठिकठिकाणी कॅमेरे लावून २४ तास निगराणी, वाहन तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिहार यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
जिल्ह्य़ातील १०६ चिल्लीर देशी दारू दुकान, २४ वाईन शॉप, ३१२ बीअर बार व २५ बीअर शॉपींच्या रोजच्या विक्रीच्या नोंदी घेऊन निवडणूक अधिकाऱ्याला माहिती दिली जात आहे. निवडणूक आयोगाच्या या सक्त निर्देशामुळे दारूविक्रेत्यांची चिंता वाढली आहे. सुरेंद्र मनपिहार यांनी जिल्ह्य़ातील सर्व होलसेल दारूविक्रेत्यांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. या जिल्हय़ातील आठ देशीविदेशी विक्रेत्यांच्या गोदामांवर कॅमेरे लावण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशी दारूच्या पाच विक्रेत्यांपैकी पूजा वाईन्स व मनोहर ट्रेडिंगचे लोहारा येथील गोदामावर तसेच हरीश वाईनचे घोडपेठ येथील गोदाम तर किशोर व अग्रवाल वाईनचे पडोली येथील गोदामांवर कॅमेरे लागले आहे.
जिल्ह्य़ात आजवर होणारी दारूची एकूण विक्री, तसेच मार्च व एप्रिलमध्ये होणारी विक्रीच्या नोंदी अतिशय काळजीपूर्वक घेतल्या जात आहेत. या दोन महिन्यातील विक्रीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली दिसली तर दारूविक्रेत्यांच्या साठय़ाची तपासणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे पथक दारूविक्रेत्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
निवडणूक पथकाने आतापर्यंत ठिकठिकाणी ६७ लाखाची रोख रक्कम जप्त केली, तर उत्पादन शुल्क विभागाच्या सहा भरारी पथकांनी जिल्हाभरात विशेष  मोहीम राबवून अवैधरित्या मद्य निर्मिती किंवा अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून १२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ३१ गुन्हे नोंदवून १७ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तसेच दोन आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.