News Flash

दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

परिसरात दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पाण्याचा स्रोत नाही. 

|| रमेश पाटील

वाडा तालुक्यात लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने

वाडा :   वाडा तालुक्यातील दुर्गम, आदिवासी लोकवस्ती असलेल्या अनेक पाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आता नित्याचीच झाली आहे.  स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे केवळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही.  लोकप्रतिनिधी  या समस्येबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप खदखदत आहे.

वाडा तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या चारही पाड्यांपासून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर  धरण अवघे एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही  येथील आदिवासींना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.   तालुक्यातील तुसे या सदन ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणारे फणस पाडा, दोडेपाडा येथेही दरवर्षी मार्चअखेरपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू होते. परिसरात दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पाण्याचा स्रोत नाही.

वाडा तालुक्याला पाच नद्यांची देणगी असूनही या पाण्याचे नियोजन नसल्याने तालुक्यातील अनेक गाव-खेड्यातील  ग्रामस्थांना उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.  नद्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा राहील, असे एकही मोठे धरण नाही.  तालुक्यात  असलेल्या पाच नद्यांपैकी कुठेतरी एखादे मोठे धरण व्हावे अशी मागणी अथवा प्रयत्न या तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीने आजवर केलेले नाहीत.

वाडा तालुक्याचे भूमिपुत्र  दामोदर शिंगडा हे २५ वर्षे खासदार होते, ल.का. दुमाडा हे पाच वर्षे खासदार होते, शंकर आबा गोवारी हे दहा वर्षे आमदार होते. तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा हे  ३० वर्षे आमदार होते तर सहा वर्षे आदिवासी विकासमंत्री  होते. तरीही पाणी प्रशन सुटलेला नाही.  सध्या वाडा तालुक्याला दौलत दरोडा, सुनील भुसारा, शांताराम मोरे असे तीन आमदार लाभलेले असतानादेखील या तालुक्यातील विविध गावांमधील हजारो महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

तालुक्यात सरासरी पर्जन्यवृष्टीचे प्रमाण २५०० ते ३००० मिलीमीटर इतके आहे.  मोठ्या प्रमाणात  पडणाऱ्या पावसाचे पाणी आडवण्यासाठी तालुक्यात एकही धरण नाही.  या तालुक्यात धरण व्हावे असा प्रयत्नही या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी केलेला नाही.  तालुक्यात प्रस्तावित असलेली गारगाई व पिंजाळ ही दोन्ही धरणे मुंबईतील नागरिकांची तहान भागवणारी आहेत.

वाडा तालुक्यातील दुर्गम भागात पाणी समस्या सुटलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना रात्रंदिवस भटकंती करावी लागते. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत आहे.    – गणपत दोडे, माजी सरपंच, ओगदा ग्रामपंचायत, ता. वाडा

वाडा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या ओगदा व तुसे परिसरातील काही पाड्यांतील ग्रामस्थांनी टॅँकरची मागणी केलेली आहे. लवकरच येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.   -विनोद गुजर, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती वाडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:03 am

Web Title: water problem in wada akp 94
Next Stories
1 फळमाशीला रोखण्यासाठी ‘सापळा’
2 प्लास्टिकड्रमच्या आडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला वेसण
3 “ होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत आणि …”
Just Now!
X