जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके सहन करता करता लोकांचा जीव मेटकुटीस आला आहे. गावोगावी लोकांचे घागर मोच्रे निघत आहेत. शहरांजवळील ‘विजयश्री’ लेआऊटमधील रहिवाशांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांना घेराव घालून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. दारव्हात तर अडाण नदीचे पात्र कोरडे पडले असून पाणी पुरवठा करणारी पेकरडा योजना बंद पडल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अडाण धरणातील पाणी नदीत सोडण्याची लोकांची मागणी आहे. अनेक वार्डात पाणीपुरवठा ठप्प आहे. 

गेल्या काही महिन्यापासून शहरातील विविध नगरातील जुन्या पाईपलाईन बदलविण्यात आल्या, परंतु शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या वार्डमधील तुंबलेल्या जलवाहिन्या बदलविण्यात न आल्याने अनेकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. काही जलवाहिन्या नाल्यामध्ये फुटल्याने नाल्यातील दूषित पाणी नळाव्दारे येत असल्याने नागरिकांना नाहक पायपीट करावी लागत आहे. चापडोह व निळोणा धरणातून शहरासह शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा केला जातो. त्याही प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असून दोन महिने पाणी पुरवठा पुरेल की नाही, हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरालगतच्या मोठय़ा िपपळगाव, वडगाव ग्रामपंचायत हद्दीत मोटय़ा प्रमाणात पाणीटंचाई आहे. त्यातच शहरालगत असलेल्या विजयश्री लेआऊटमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी पुरवठा केला जात नसल्याने महिलांनी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता दिनेश बोरकर यांना घेराव घातला होता. यवतमाळ शहरातही जीवन प्राधिकरणकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. महिलांना रात्र-रात्र जागून पाणी साठवावे लागत आहे.
आर्णी शहरातही ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. राळेगावला ग्रामपंचायतकडून नळ योजनेव्दारे पाणी पुरवठा केला जातो. येथे ८ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे, पण भारनियमामुळे ती विस्कळीत झाली आहे. जिल्ह्य़ात १० गावांना टंॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो. कारेगाव येथे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ काढतांना डिझेल इंजिनच्या धुरामुळे ६ मजूरांचा गुदमरून मुत्यू झाला होता. तेथे आता टंॅकरने पाणी पुरवठा केला जातो. स्वातंत्र्याच्या ६०-६५ वर्षांत साधे शुध्द पाणी दररोज मिळू नये यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकते, असा प्रश्न विचारला जात आहे.

वानरसेनेचा जलोच्छाद
जिल्ह्यातील ६५ सिंचन प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाण्यासाठी दाहीदिशा लोकांची भटकंती सुरू आहे. यवतमाळजवळच्या जुना उमरसरा भागात डझनावारी वानरांनी आपल्या पिल्लांना पोटाशी धरत पाण्यासाठी सोमवारी उच्छाद मांडला. प्राण्यांची आणि पक्ष्यांचीही पाण्यासाठी भटकंती मानवतावाद्यांसाठी चिंतेचा विषय झाली आहे. जिल्ह्यत ३ मोठे, ५ मध्यम आणि ६२ लघुसिंचन प्रकल्प आहेत. पूस प्रकल्पात १७ टक्के जलसाठा आहे. गोखी प्रकल्पात २३ टक्के जलसाठा आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठय़ाचा स्तर दिवसेंदिवस खाली जात आहे. यवतमाळ आणि नजिकच्या ७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात रोज शेकडो लोक श्रमदानाने गाळ उपसण्याचे काम व्रत म्हणूनच करीत असल्याचे अपूर्व चित्र बाकी राज्यभर कौतुकाचा विषय झाला आहे.