एकीकडे करोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईच्‍या झळा सहन कराव्‍या लागताहेत . तळपत्‍या उन्‍हात डोक्‍यावर हंडा घेवून पाण्‍यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी टंचाई दूर करण्‍यासाठी प्रशासनाकडून प्रयत्‍न केले जात आहेत . रायगड जिल्‍हयात सध्‍या १२ तालुके टँकरग्रस्‍त म्‍हणून जाहीर झाले असून तेथे ३१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

राज्‍यात जे अतिपावसाचे जिल्‍हे आहेत त्‍यात रायगड जिल्‍हयाचा समावेश होतो . दरवर्षी जिल्‍हयात ३ हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो . तरीदेखील पाणी साठवण्‍याचे कोणतेच योग्‍य नियोजन नसल्‍याने नागरीकांना एप्रिल आणि मे महिन्‍यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते . हंडाभर पाण्‍यासाठी उन्‍हातान्‍हातून भटकंती करावी लागते . जिल्‍हयात हेटवणे , मोर्बेसारखी मोठी धरणे आहेत परंतु त्‍यांचे पाणी मुंबई , नवीमुंबईसारख्‍या मोठया शहरांनाच अधिक मिळते . परिणामी धरणं गावात असूनही ग्रामस्‍थांना पिण्‍यासाठी देखील पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे .

एकीकडे कोरोनामुळे लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे . रायगड जिल्‍हा ऑरेंज झोनमध्‍ये असला तरी अद्याप कुठलेही उद्योग सुरू झालेले नाहीत . अशा स्थितीत रोजगाराची मोठी समस्‍या निर्माण झाली आहे . अगोदरच पोटापाण्‍यासाठी धडपड करावी लागते आहे अशावेळी पाणीटंचाईमुळे हाल वाढत चालले आहेत .

पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी रायगड जिल्‍हा प्रशासनाकडून दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो . तसा तो यावर्षीदेखील करण्‍यात आला आहे . यंदा साधारण २८३ गावे आणि ७९४ वाडयांमध्‍ये पाणीटंचाई भासेल असे गृहित धरून नियोजन करण्‍यात आले आहे . सध्‍या १२ तालुके हे टँकरग्रस्‍त म्‍हणून जाहीर करण्‍यात आले आहेत .  ६६ गावे आणि २२६ वाडया अशा २९२ ठिकाणी ३१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे . जिल्‍हयात ४१५ विंधन विहिरींची कामे प्रस्‍तावीत आहेत त्‍यातील १३६ कामांचे प्रस्‍ताव जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्‍यात आले त्‍यापैकी १३१ कामांना मंजुरी मिळाली आहे . याशिवाय २० गावे आणि १५ वाडयांवरील नळपाणी योजनांच्‍या दुरूस्‍तीची कामे हाती घेण्‍यात आली आहेत .

विहीरींचे खोलीकरण, गाळ काढणे अशा कामांचा देखील टंचाई आराखडयात समावेश आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांवरील खर्चासाठी रायगड जिल्‍हा परीषदेने जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे अडीच कोटी रूपयांच्‍या निधीची मागणी केली आहे .

टँकरग्रस्‍त तालुक्यांमध्ये  पेण , महाड , पोलादपूर , उरण , पनवेल , खालापूर , रोहा , पाली , श्रीवर्धन , मुरूड , तळा , कर्जत यांचा समावेश आहे.  गावात टँकर येतो पण ते पाणी पुरत नाही मग येथील नागरिकांना उर्वरीत गरजेच्‍या पाण्‍यासाठी फिरावे लागत आहे.

ज्‍या गावात पाणी टंचाई आहे, तेथे टँकरने पाणी पुरवले जात आहे. मागणी वाढल्‍यास आणखी टँकर्स वाढवले जातील. विंधन विहिरी तसेच नळपाणी योजनांच्‍या दुरूस्‍तीची कामेदेखील हाती घेण्‍यात आली आहेत . जेणेकरून तेथील पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी.कोळी यांनी सांगितले आहे.