02 March 2021

News Flash

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान – मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण

बाबासाहेबांनी सामाजिक, वैचारिक क्रांती केली. संविधान लिहिले. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे यासाठी लढा दिला. एकीकडे परकीयांशीही तर दुसरीकडे समतेसाठी त्यांनी स्वकीयांशी लढा दिला. पण यातही त्यांनी आपला ज्ञानप्राप्तीचा व्यासंग जतन केला. जगाला दिशा देणारा हा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, “बाबासाहेबांना वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा प्रचंड व्यासंग होता. पण यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. ज्ञानार्जनासाठी त्यांच्या वाट्याला आलेल्या अडचणी, कष्ट यापुढे कोणत्याही व्यक्तीच्या, गोरगरीबांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी शासन कार्य करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातूनही यासाठी निश्चितच दिशादर्शन होईल. हे संशोधन केंद्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीशी संलग्न असेल, तसेच ते कोलंबिया विद्यापीठाशी सुद्धा संलग्न झाले पाहिजे. बाबासाहेबांनी आपले ज्ञान स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता देशाला त्याचा उपयोग करुन दिला.” बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार यापुढील काळातही सर्वांना दिशादर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य सर्वांना माहिती आहे. पण बाबासाहेबांनी याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिकदृष्टी देशाला आणि समाजाला महत्त्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभे रहात आहे. त्यांचे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील,” असे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरु करण्याचे मुंबई विद्यापीठाचे हे एक चांगले पाऊल आहे. उपाशी राहून, गरीबीशी सामना करत ज्यांनी अभ्यास केला त्या बाबासाहेबांनी पुढे देशाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे ते नेहमी म्हणत. बाबासाहेब हे फक्त दलितांच्या लढ्याचे नेते नव्हते तर देशातील परिवर्तनवादी चळवळीचे ते प्रणेते होते”

“विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरु व्हावे अशी मागणी २०१२ पासून विविधस्तरावरुन होत होती. आता ही मागणी प्रत्यक्षात साकारत आहे. बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे विचार याची माहिती विविध भाषांमधून मिळेल. या केंद्राच्या माध्यमातून त्यांचे कार्य आणि विचारांवर संशोधन होऊन ते जगभरात पोहोचेल. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी उदय सामंत यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राविषयी

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संशोधन केंद्रात बाबासाहेबांची लोकशाही मूल्याधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेची जीवनदृष्टी केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय आणि मानव्यविद्या या अभ्यास क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी ‘ध्येयधोरणे आणि विकासाची दिशा’ या संदर्भातील संशोधनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये आंबेडकर स्टडीज, बुद्धिस्ट थॉट्स, डेव्हलपमेंट स्टडीज आणि सोशल पॉलिसी या विषयात पदव्यूत्तर पदवी करता येणार आहे. याचबरोबर आंबेडकरी विचार आणि तत्वज्ञान या विषयाचा देखील अभ्यास ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्कॉलर्सना संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सोय आहे. तसेच ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 9:35 pm

Web Title: we are proud of the great man who gave direction to the world in our state says cm uddhav thackeray aau 85
Next Stories
1 सोलापूर: वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला ट्रक; जागीच झाला मृत्यू
2 “मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडूंची लाचारी”
3 शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट; शेतकऱ्यांची मांडणार बाजू
Just Now!
X