महाराष्ट्रातील महाविकासआघाडी प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असं वक्तव्य काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या अपयाशाबाबतही ते बोलले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामाना पेपर देखील वाचत नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत कुठंतरी धुसफुस सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज – संजय राऊत

“संजय राऊत काय बोलता याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचं होतं ते अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. त्यांचा सामाना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलेलं आहे. त्यामुळे माध्यमांद्वारे आम्ही स्पष्ट सांगितलं आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं.” असं नाना पटोले यांनी टीव्ही – 9 शी बोलताना म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत? –
“एकंदरीतच चिंता व्यक्त करावी असं देशाचं वातावरण आहे, काँग्रेसबद्दल चिंता नाही. काँग्रेस पश्चिम बंगाल असेल किंवा…. काँग्रेसच्या नेतृत्वा ही आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेसला जेव्हा अपयश मिळतं तेव्हा आम्हाला नक्कीच चिंता वाटते. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी मुसंडी मारली, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. भविष्यात या देशात विरोधी पक्षांची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभं करावं,अशी सर्वांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी निर्माण होऊ शकणार नाही. आसामध्ये देखील काँग्रसेला चांगलं यश मिळालं पण सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ, तामिळनाडूनत त्यांना थोडफार यश आहे. पण काँग्रेसनं अजून मुसंडी मारणं गरजेचं आहे. आपल्या देशाला विरोधी पक्षाच्या उत्तम आघाडीची आवश्यकता आहे. जसं महाराष्ट्रात महाविकासआघाडी काम करते, अशा प्रकारे काही आपण उभं करू शकतो का? या पार्श्वभूमीवर कालच माझी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. लवकरच याबाबत हालचाली सुरू होतील.” असं संजय राऊत काल माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.