एक शिवभक्त म्हणून माझी नेहमी हीच भूमिका राहिली आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं पाहिजे. हेच नाहीतर महापुरुषांची नावं देखील आपण आदरानेच घेतली पाहिजेत, कारण आपले अस्तित्व त्यांच्यामुळे आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि एका केंद्रीय मंत्र्याने महाराजांचं नाव केवळ ‘शिवाजी’ असे घेतले होते. मी त्या दोघांना तात्काळ विरोध केला आणि माफी मागायला लावली. असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं की, मला हा विषय आधीपासूनच माहिती आहे, की महाराजांचे नाव कसे घ्यायचे? याबाबत उत्तर भारतातील लोकांना कमी माहिती आहे. दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी करताना ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ म्हणजे महादेवाचा जन्मोत्सव आहे, असेच तिथल्या लोकांना वाटत होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर त्यांना शिवछत्रपतींचा जन्मोत्सव असल्याचे लक्षात येत होतं. मात्र जर आपण महाराष्ट्रातच एकेरी पद्धतीने नाव घेत असू तर त्यांना लक्षातच येणार नाही. म्हणून मी संसदेत बोलताना जाणीवपूर्वक ‘छत्रपती शिवाजी महाराज’, राजर्षी ‘छत्रपती शाहू महाराज’ असे पूर्ण नाव घेतो. महापुरुषांची नावं आपण आदरानेच घेतली पाहिजेत. कारण आपले अस्तित्व त्यांच्यामुळे आहे. महाराणी ताराबाई राणी साहेब, महात्मा जोतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्वच महापुरुषांची नावं आदराने घेतली जावीत, असं मला वाटत. मुंबईच्या विमानतळाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज’ विमानतळ असा व्हावा यासाठी मी प्रयत्न केला. कारण, देशविदेशातून लोक इथे येतात. आज मी विदेशात जाताना किंवा परदेशातून भारतात येताना, मुंबईच्या विमानतळाची घोषणा ऐकल्यावर गर्व वाटतो, असे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.

इतिहासकार , विद्वानांनी निर्णय घ्यावा
एक शिवभक्त म्हणून मी माझी भूमिका ‘शिवाजी विद्यापीठाच्या’ संदर्भातही मांडली, त्यात काही इतिहासकारांनी मला वैयक्तिक सांगितलं की ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असं लोक बोलणार नाहीत,तर या नावाची आद्यक्षरे घेऊन उच्चार केला जाईल. असो…सर्व इतिहासकारांनी, विद्वानांनी आणि शिवभक्तांनी मिळून निर्णय घ्यावा..मी तरी सामान्य जन भावनेसोबत नेहमी होतो, आहे आणि भविष्यात सुद्धा असेन, असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.