राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या जिल्ह्य़ात मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भाजपप्रवेशाचे त्यांच्या समर्थकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

उदयनराजे समर्थकांनी त्यांचा प्रवेश होताच सातारा शहर आणि परिसरात दुचाकीवर फेरी काढत, घोषणाबाजी आणि आतषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. उदयनराजे यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर परिसरात सकाळीच त्यांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना कडवी लढत देणारे शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी शरद पवारांची भेट घेतली. मात्र आपली ही भेट वैयक्तिक कामासाठी असून आपण महायुतीतच असल्याचा खुलासा त्यांनी केल्यावर यावर पडदा पडला.

राजे गेले तरी प्रजा राष्ट्रवादीबरोबर-भुजबळ

मुंबई: उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही. राजे गेले असले तरी सातारा जिल्ह्य़ातील प्रजा मात्र आमच्या सोबतच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली. सातारा जिल्हा नेहमीच राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभा राहिला आहे. आताही उदयनराजे भाजपत गेल्यावरही तो राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून देईल, असे भुजबळ म्हणाले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा झाली. त्यात अनेक उमेदवार अदला-बदल करणे अथवा नवीन उमेदवार देणे यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडीची स्थिती बिकट : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाला मोठे खिंडार पडलेले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  दुसरीकडे  काँग्रेसलाही गळती लागली आहे. किसनवीरचे अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे, ‘कराड उत्तर’चे धर्यशील कदम यांच्या पाठोपाठ माजी जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांनीही पक्षाची साथ सोडली आहे.