केंद्रातील सत्ता हाती असलेल्या बलाढ्य भाजपाला धूळ चारत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं. दोनशे अधिक जागा जिंकत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील स्वतःच वर्चस्व सिद्ध केलं. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणूक निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेनेनंही नरेंद्र मोदी, अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला सुनावलं आहे. “करोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. पण झाले काय?,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाच्या वर्मावर बोट ठेवलं.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी (२ मे) जाहीर झाले. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता राखली. बंगाल निकालावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. तरी प. बंगालात काय होणार, याकडेच सगळ्याचे लक्ष होते. कारण देशात थैमान घालत असलेल्या महाभयंकर करोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. प. बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱ्या लादण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपाला धूळ चारली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शाहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपाचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करून टाकला. ममता दीदी २ मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ‘२ मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजपा हरला आणि करोना जिंकला,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh
ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

“पाच राज्यांतील, विशेषतः प. बंगालातील निवडणुकीच्या अनियंत्रित रेट्यामुळे देशात करोना वाढत गेला हे मद्रास हायकोर्टाचे निरीक्षण आहे. देशात ज्या वेगाने करोना वाढला व पडझड झाली त्यास मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगास जबाबदार धरले व ते योग्यच आहे. फक्त प. बंगाल जिंकायचेच, या एका ईर्षेने व द्वेषाने ‘मोदी-शाहां’चा भाजपा मैदानात उतरला. त्यांनी लाखोंच्या सभा, रोड शो करून करोनाबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवले व निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन करोना निवारणाच्या देवपूजेला लागले, पण वेळ हातची गेली आहे. इतके करूनही प. बंगालच्या जनतेने भाजपाला साफ नाकारले आहे. प. बंगालात ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपाने काय करायचे बाकी ठेवले? ‘जय श्रीराम’चे नारे देण्यापासून ते ममतांना ‘बेगम ममता’ असे डिवचण्यापर्यंत हिंदू-मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही,” असं म्हणत शिवसेनेनं नरेंद्र मोदींसह भाजपाला चिमटा काढला आहे.

“जेथे हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जी यांनी विजय मिळविला. या काळात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशातही सैर करून आले. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कन्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांना प्रदान करून आले. त्यामुळे प. बंगालातील मुसलमान मते मिळतील असा कयास असावा, पण तसे घडले नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्षही उभा-आडवा फोडला, पण तरीही विषम लढाईत तृणमूल काँग्रेसने मोदी-शहांच्या राजकारणास धूळ चारली. हे ऐतिहासिक व सगळ्यासाठी प्रेरणादायी आहे. प. बंगालातील लढाईत डावे व काँग्रेस कुठे औषधालाही उरले नाहीत. डाव्यांची जागा भाजपाने घेतली. मतांची बेरीज वाढली तरी त्या प्रमाणात जागा जिंकता आल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाने अनेक मोहरे उभे केले. केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियोपासून पत्रकार स्वपन दासगुप्तांपर्यंत. ते सगळे आडवे झाले. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. दोनशेवर जागा जिंकून ममता यांनी ते सिद्ध केले,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“प. बंगालातील ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव आहे व या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. तेथे सामना काँग्रेसशी झाला. तामिळनाडूत ‘द्रमुक’ने सत्ता मिळवली. पुदुचेरी ही ३० आमदारांची विधानसभा. तेथे भाजपाने विजय मिळवला. आसामात काँग्रेसने चांगली लढत देऊनही भाजपाने पुन्हा विजय मिळविला. मग भाजपाच्या हाती नव्याने काय लागले? मोदी-शहांचा करिश्मा की काय, तो दक्षिणेत म्हणजे केरळ-तामिळनाडूत चाललाच नाही व प. बंगालात धाप लागेपर्यंत प्रचार करूनही यश मिळाले नाही. केरळात भाजपाने वयाची ८० पार केलेले ‘मेट्रो मॅन’ श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. तेथे भाजपला ५ जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा अर्थ असा की, मोदी-शाहांच्या भाजपाकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असे नाही. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने प. बंगालकडून शिकावे, असा प्रसंग घडला आहे!,” असं म्हणत शिवसेनेनं ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे.