रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवार यांच्यावर टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे शरद पवार हे कधी क्रिकेट खेळले होते का?, असा खोचक प्रश्न खोत यांनी विचारला आहे. शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरने इतर क्षेत्रांसंदर्भात वक्तव्य करताना काळजी घेण्याची गरज आहे असा सल्ला दिला होता. अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या ट्विटनंतर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. याचवरुन बोलताना खोत यांनी थेट पवारांवर निशाणा साधालाय.

साताऱ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना खोत यांनी पवारांच्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित केले. सचिनच्या ट्विटवर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी दिलेली प्रतिक्रिया हस्यास्पद असल्याचा टोला खोत यांनी लगावला. “सचिनच्या ट्विटवर पवरांनी ज्याला ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्याने बोलावं असं विधान केल्याचं ऐकून थोडा वेळ हसू आलं,” असं खोत यांनी म्हटलं आहे. शऱद पवार कधी क्रिकेट खेळले होते का?, सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत तर ते कधी कुस्ती खेळले आहेत का?, असा प्रश्नही खोत यांनी यावेळी विचारला. असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये अनेकांना मला सोडून दुसऱ्यांना काही यातलं कळत नाही असं वाटतं. अशापद्धतीने इतरांना कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात सुरु केलीय. हे असं वागणं योग्य नसून नवीन नेतृत्वासाठी हे असं वागणं हे हानीकारक असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.

रिहानाचाही घेतला समाचार

पॉप स्टार रिहानाचाही खोत यांनी आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला. रिहानाने काहीतरी ट्विट केलं आहे. तिला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा आलाय. ती ज्या खंडात राहते तिथं काही लोकं अर्धपोटीच रोहातत. त्यासंदर्भातही तिने ट्विट करायला हवं होतं, असा टोला खोत यांनी रिहानाच्या ट्विटबद्दल बोलताना लगावला आहे.

पवार काय म्हणाले होते?

शनिवारी पुण्यात कार्यक्रमासाठी हजर असलेल्या पावर यांना मान्यवरांनी केलेल्या ट्विटसंदर्भात पत्रकारांशी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे व्यक्त होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील,” असं पवार म्हणाले होते.

काय टि्वट केलं होतं सचिन तेंडुलकरने

“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.