करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देशात लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्यात करोना योद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले आहे. लवकरच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु होईल. कारण या गटालाही करोना व्हायरसपासून मोठा धोका आहे. सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेत्यांना लसीचे डोस कधी देणार? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
आज अहमदनगर जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या शरद पवारांनी आपण इतक्यात लस घेणार नसल्याचे सांगितले. “करोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला बीसीजीची लस दिली. तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घे, असे सांगत त्यांनी मला बीसीजी लसीचा डोस दिला होता” असे शरद पवार यांनी सांगितले.
अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पातील एका इमारतीला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, “आता मी नगरला दोन खासगी रुग्णालयाच्या उद्घटनासाठी निघालो आहे. तिथे जाऊन परिस्थिती पाहतो. परिस्थिती गंभीर असेल, तर मुंबईला न जाता पुण्याला येऊन लसीचा डोस घेईन असे सांगितले. आता इथे परिस्थिती पाहिली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे मी आता पुण्याला न जाता थेट मुंबईला जाणार आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 6:21 pm