रवींद्र केसकर

एरवी माणसांच्या गर्दीने गजबजलेले उस्मानाबादचे बस स्थानक सध्या ओस पडले आहे. येथील भयाण शांतता दिवसादेखील मनात धडकी भरवणारी आहे. मात्र, ओस पडलेले हे बसस्थानकच मागील दहा दिवसांपासून गतिमंद कविता आणि तिच्या आठ महिन्याच्या निरागस मुलीचा आधार बनले आहे. रात्रीच्या काळोखात निराधार आईचे उसासे आणि तिच्या मुलीचे हृदय पिळवटून टाकणारं रडू याखेरीज दुसऱ्या कोणाचीच त्यांना सोबत नाही. लॉकडाउनच्या काळात पुण्यातून आलेली कविता इथे अडकून पडली. इच्छितस्थळी जाण्यासाठी धडपडणारी ही महिला डोळ्यात सारा जीव गोळा करून एकच प्रश्न विचारते, “गाडी कधी चालू होणार आहे हो?”

कविताचे वय साधारण वीसएक वर्षे असेल. तिचा नवरा पुण्याचा आहे. आता तो तिला बघत नाही. “त्यानं सोडून दिलं आहे मला, राजस्थानी आहे. उमेश त्याचं नाव” अशी काहीतरी बडबड ती सतत करत राहते. या गतिमंद असलेल्या कवितासोबत तिची आठ महिन्यांची चुणचुणीत मुलगी आहे. महक असं तिचं नाव असल्याचं कविता सांगते. मागील दहा दिवसांपासून कविता आणि तिची निरागस महक उस्मानाबाद शहरातील बस स्थानकात मुक्कामास आहेत. एरवी अफाट गर्दीने गजबजलेले हे बस स्थानक टाळेबंदीनंतर ओस पडले आहे. एक-दोन निराधार फिरस्ते सोडले तर बस स्थानकाकडे सध्या कोणीच फिरकत नाही. रात्रीच्या भयाण काळोखात तर या दोघींना केवळ एकमेकींचाच आधार. गतिमंद आईचे उसासे अन पोटभरून दूध न मिळाल्याने सारा आसमंत पिळवटून टाकणारे उपासपोटी महकचे रडणे. दोघीही रडून थकतात आणि थकून शांत होतात. एकमेकींना दिलासा देत, एकमेकींचं मनोरंजनही दोघीच करतात.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये

पुण्यात नवऱ्याकडे गेलेल्या कविताला त्यानं झिडकारलं. तान्हुल्या महकची देखील त्याला काळजी वाटली नाही. पंढरपूर येथे कविताच्या मामाची मुलगी राहते. किमान ती तरी आधार देईल म्हणून पुण्याहून पंढरपूरला निघालेली कविता मजल-दरमजल करीत उस्मानाबाद येथे पोहचली आणि नेमकी त्याच दिवशी टाळेबंदी जाहीर झाली. कविताचे मानसिक वय आणि महकचे शारीरिक वय जवळपास सारखेच. त्यामुळे आजूबाजूला काय सुरू आहे हे त्या दोघींनाही उमजेना. इथे आलो तेव्हा भरपूर गाड्या आणि बक्कळ माणसं होती आता अचानक सगळं कुठं गेलं असा प्रश्न कविताचा डोळ्यात उभा आहे. तिला धड ते व्यक्तही करता येत नाही. मागील चार दिवसांपासून शंकर डिसले आणि प्रदीप यादव तिला मोफत शिवभोजन आणून देत आहेत. कुणी महकसाठी दूध आणून देतो. मात्र, हे सगळं तात्पुरतं आहे. दोघींना हक्काचा आधार नाही की हक्काची माणसं.

आई-वडील कुठे आहेत? असं तिला विचारलं तर बराच वेळ ती शांत होती. मेंदूची गती कमी असली तरी हृदयाला प्रश्न कळला असावा. डोळ्यांच्या कडा क्षणात ओल्या झाल्या. आई मेली अन् बाप कुठे आहे ते माहीत नाही असे सांगून बराच वेळ ती शांत राहिली. कळवळून रडणाऱ्या महकच्या आवाजाने ती भानावर आली. “मला पंढरपूरला जायचे आहे. गाडी कधी चालू होणार आहे हो?” एवढा एकच प्रश्न कितीतरी वेळ ती विचारत होती. बाहेरच्या जगात एका संसर्गजन्य विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटाची तिला अजिबात जाणीव नाही. आई-वडिलांच्या मायेला मुकलेली आणि नवऱ्याच्या आधारविना निराधार झालेली गतिमंद कविता आपल्या निरागस मुलीला तरी हक्काचा आधार मिळावा यासाठी पांडुरंगाच्या पंढरपूरला जाऊ इच्छित आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा ती एकच प्रश्न विचारत आहे. “गाडी कधी चालू होणार आहे हो?”