हर्षद कशाळकर

उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यात सर्वत्र अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढते. यंदा कांद्याची बाजारपेठेतील आवक वाढली असली तरी टाळेबंदीमुळे ग्राहक आणि वाहतूक या दोन्हींवर परिणाम झाला. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

अलिबाग तालुक्यात नेऊली, खंडाळा परिसरात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. भात पिकानंतरचे दुबार पीक म्हणून जवळपास २०० हेक्टरवर हे पीक घेतले जाते. औषधी गुणधर्म आणि रुचकर चवीमुळे या कांद्याला मोठी मागणी असते. त्यामुळे या कांद्याला चांगला दरही मिळत असतो. लांबलेला पावसाळा आणि त्यानंतर हवामानातील अनियमितता यामुळे या वर्षी अपेक्षित लागवड झाली नव्हती. पण अनेक अडचणींवर मात करून शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक जोपासले. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पांढरा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला २५० ते ३०० रुपयांना कांद्याची एक माळ विकली जात होती. देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि टाळेबंदी जाहीर झाली. या टाळेबंदीचा कांद्याच्या विक्रीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. कांद्याला असणारी मागणी अचानक कमी झाली, विक्रीवर परिणाम झाला. शेतात तयार झालेला कांदा विकायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. वडखळचे व्यापारी अलिबाग येथील पांढरा कांदा विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात घेऊन जातात. पण टाळेबंदीमुळे या वर्षी तेही फिरकले नाहीत. अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा ओघ बंद असल्याने स्थानिक विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे कांद्याचे दर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

शेतकरी अस्वस्थ असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा कृषी विभागाने के ला. पांढरा कांदा तीन ते चार महिने टिकू शकतो. त्यामुळे टाळेबंदीनंतर कांद्याची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढेल असा विश्वास त्यांना आहे. टाळेबंदीतही कांदा विक्रीवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात येऊन कांद्याची विक्री करण्याची परवानगी आम्ही देत आहोत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची कोंडी सुटेल, असा विश्वास कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी व्यक्त केला आहे.

पांढरा कांदा विक्रीसाठी तयार झाला आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत या कांद्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. पण टाळेबंदीमुळे कांद्याला अपेक्षित उठाव मिळताना दिसत नाही. हीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही सुटणार नाही

– राजेंद्र म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी