शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनी काँग्रेसच्या नेत्यांनी साधं ट्वीटही केलं नाही असा टोला भाजपा नेते नितेश राणे यांनी लगावला आहे. मात्र या ट्विटला आता महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र देहाडे यांनी पुराव्यासहीत उत्तर दिलं आहे. त्यानंतर नितेश यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधींच्या ट्विटची मागणी केल्यानंतर काँग्रेसने भाजपा शिवसेना एवढ्या वर्षांपासून युतीत होते तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी साधं एक ट्विटही करता आलं नाही का?, असा प्रश्न नितेश यांना विचारला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. तर अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करणारं एक ट्विट केलं. “संपूर्ण दिवस संपला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काँग्रेसश्रेष्ठींकडून एकही संदेश किंवा ट्वीट करण्यात आलेलं नाही. जर बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेतली जात नसेल तर शिवसेनेकडे उरलंच काय?,” असा सवालही नितेश राणे यांनी केला. याच ट्विटला उत्तर देताना जितेंद्र देहाडे यांनी काँग्रेसच्या सहा नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारे केलेल्या ट्विटसचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले. “नितेशजी तुमच्या माहितीसाठी,” अशा कॅप्शनसहीत हे स्क्रीनशॉर्ट जितेंद्र यांनी शेअर केले आहेत.

यावर नितेश यांनी जितेंद्र यांचे आभार मानले त्याचबरोबर, “मला राहुलजी किंवा प्रियंकाजी यांचेही एखादे ट्विट फॉरवर्ड करा. कारण इंदिराजी आणि राजीवजींच्या स्मृतीदिनी उद्धवजींनी पोस्ट केलेले फोटो आपल्याकडे आहेत,” असंही म्हटलं. यावर उत्तर देताना जितेंद्र यांनी, “भाजपा आणि शिवसेना बराच काय युतीमध्ये होते. मग तुम्हीच मला का सांगत नाही की नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजींनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त एखादं ट्विट का केलं नाही?,” असा प्रश्न विचारला आहे. तसेच जितेंद्र यांनी व्यक्ती किंवा ती भूषवत असलेल्या पदाचा मान म्हणून तरी ट्विट करायला हवं होतं असंही म्हटलं आहे.

निलेश राणेंकडूनही ट्वीट

मंगळवारी नितेश राणे यांचे धाकटे बंधू निलेश राणे यांनीही ट्विटवरुन बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला टोला लगावला. “बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरलेलं नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन,” असं म्हणत नाव न घेता निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.