शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, मकरंद पाटील यांची भूमिका

वाई : आमचे कितीही नुकसान होऊ  देत, पण शरद पवारांना सोडून जाणार नाही. भाजपकडून आम्हालाही पक्ष प्रवेशासाठी विचारणा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना अशा वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणार नाही, अशा शब्दांत सातारा जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, मकरंद पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान जिल्ह्य़ातील पक्षाचे जे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, ते केवळ सत्तेसाठी लाचार होत चालले असल्याची टीकाही या आमदारांनी केली आहे.

आमदार शिवेंद्रसिहराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्या ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. शिवेंद्रसिहराजे यांच्यापूर्वीही पक्षाच्या छोटय़ा-मोठय़ा अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्य़ात पक्षाला खिंडार पडले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्यापाठोपाठ पक्षाचे एक माजी आमदार आणि एक ज्येष्ठ नेते तथा पदाधिकारी देखील पक्ष सोडत भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील पक्षाच्या चार आमदारांनी आज सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधत आपण पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. या आमदारांनी एकत्रित रीत्या आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीतून जात आहे. सत्ता नसल्याने राज्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. आम्हालाही भाजपकडून पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली होती. पण ज्या पक्षाने आम्हाला पद, प्रतिष्ठा आणि स्थैर्य दिले, त्या पक्षाला केवळ राजकीय स्वार्थापोटी अशा अडचणीच्या काळात सोडून जाणे योग्य नाही.

दरम्यान, या चार आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असली, तरी त्यांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मात्र आता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. एकटे शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजपप्रवेशाबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे २२ सदस्य, सातारा नगरपालिकेचे पंधराहून अधिक नगरसेवक आणि जिल्हा बँकेचे ९ संचालक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील तालुका पातळीवरही राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची चिन्हे व्यक्त केली जात आहे.