राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही वर्षांपूर्वी पाथरी येथील मंदिरास भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाथरीचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. याचाच अर्थ राष्ट्रपतींनाही पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचे मान्य आहे. राष्ट्रपती हे देशाच्या सर्वोच्च स्थानी असून ते देशाचे पालक आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या पुढे जाऊन मी साईबाबांच्या पाथरी या जन्मस्थळाबाबत कोणतेही विधान करू शकत नाही. विशेष म्हणजे पाथरीच्या विकासासाठी सरकार मदत करण्यास तयार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मलिक यांनी शनिवारी पत्रकार बैठकीतून संवाद साधला. “परभणीतील दगडफेकप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी आपल्याकडे पोलीस प्रशासन विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. जिल्ह्यतील रस्त्यांचा प्रश्न खूपच गंभीर आहे. याशिवाय वाळूचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येणार असून १ एप्रिलपासून वाळूचे ई- लिलाव सुरू होतील तसेच जिल्ह्यतील सर्व शासकीय समित्या गठीत करण्यात येतील” असे मलिक यांनी या वेळी स्पष्ट केले. याशिवाय, “किमान समान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येणार असून त्या दृष्टीने परभणीतील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यतील आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्नांवर आरोग्यमंत्री यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येतील. तसेच वक्फ बोर्डच्या माध्यमातून मास्टर प्लॅन तयार करून शहरातील उर्सच्या जागेतून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येतील”, असेही नवाब मलिक म्हणाले.