सरकारने मला विकास कामांसाठी मदत करावी, या अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालो. असल्याचं एकनाथ खडसे यांनी आज म्हटलं आहे. तसेच, नाथाभाऊ हा स्वस्थ बसणारा नव्हता. असंख्य लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. तुम्ही जर तिकीट न देऊन घरी बसायची भाषा करत असाल, तर मला मान्य नाही. मी पदाचा भुकेला नाही. पदं मला अनेक येतात व जातात. असं देखील खडसेंनी यावेळी म्हटलं आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मुंबईत जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आज जळगावमध्ये परतले, यानंतर ते मुक्ताईनगर येथे आल्यावर त्यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलाताना आपण भाजपा सोडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत माहिती दिली.

यावेळी खडसे म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या कार्यकर्त्यांचा एक दबाव होता. की, भाजपामध्ये तुमच्यावर फार मोठ्याप्रमाणावर अन्याय होत होता, अपमान झाला.. इत्यादी हे सर्वांनाच माहिती आहे. हा दबाव एकप्रकारे वाढत होता. अनेक कार्यकर्ते तर अलिकडच्या काळात अगदी नाराजीच्या भावनेतून बोलायला लागले होते. अशा परिस्थिती आता आपल्याला राजकारणामध्ये विकासकामांसाठी राहायचं आहे. आमच्या मतदार संघातील लोकांची अपेक्षा ही विकासकामांची आहे. मी पदावर आलो की किंवा नाही आलो तरी मी विकासकामांचे प्रश्न सातत्याने मांडले आहेत. जनतेची हीच अपेक्षा आहे. त्यांना तुमच्या राजकारणाशी काही देणंघेणं नाही. त्यांना तुमच्या पक्षाशी देखील काही देणंघेणं नाही. त्यांना केवळ विकासकामांना तडीस नेणारा व अन्याय, अत्याचारांचे प्रश्न मांडणारा प्रतिनिधी हवा आहे. त्यांना विश्वास आहे की नाथाभाऊ अशाप्रकारचे काम करेल.

“दुर्देवाने विधानसभेत माझं तिकीट कापलं गेलं. तिकीट कापलं गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या सारख्यांनी सांगितलं की, आता मार्गदर्शकाची भूमिका घ्या. म्हणजे याचा अर्थ होता की राजकीय सन्यास घ्या आणि घरी बसा. नाथाभाऊ हा स्वस्थ बसणारा नव्हता. असंख्य लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. तुम्ही जर तिकीट न देऊन घरी बसायची भाषा करत असाल, तर मला मान्य नाही. मी पदाचा भुकेला नाही. पदं मला अनेक येतात व जातात. परंतु, या ठिकाणी पुढील कालखंडात पुर्णपणे राजकीय सन्यास झाला असता आणि मग घरीच बसायची वेळ आली असती. म्हणून मी असं ठरवलं. लोकांनी असं ठरवलं आपल्या या भागाच्या विकासासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत, सरकारी पक्षाकडे असले पाहिजे. ज्याचं सरकार आहे त्याची यासाठी मदत होते. म्हणून या सरकारने मला विकासकामांसाठी मदत करावी, या अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालो.” असे खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.