स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बाबाराव व शोभा मस्की या दाम्पत्याने राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर चप्पल भिरकावल्याची घटना मंगळवारी गडचिरोली जिल्ह्य़ातील चामोर्शी येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी शोभा मस्की यांना ताब्यात घेतले आहे.
शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील चामोर्शी येथे मंगळवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री व जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री आर. आर. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरेश सावकार पोरेड्डीवार उपस्थित होते. अजित पवार यांच्या भाषणानंतर मेळावा संपताच या कार्यक्रमाला उपस्थित बाबाराव मस्की व शोभा मस्की या दाम्पत्याने अजित पवार यांच्या विरोधात व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ जोरदार नारेबाजी करण्यास सुरुवात केली. स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देत असतानाच शोभा मस्की यांनी अजित पवारांच्या दिशेने चप्पल भिरकावली. ही चप्पल व्यासपीठावरून खाली उतरलेल्या अजित पवार यांच्यापासून शंभर मीटर अंतरावर पडली. हा प्रकार पोलीस दलाच्या लक्षात येताच या दाम्पत्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. यानंतर या दाम्पत्याला चामोर्शी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असून अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या प्रकारामुळे अजित पवार चांगलेच संतापले आहेत.