नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन मुलीने अब्रू वाचवण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारल्याची घटना ताजी असताना असाच प्रकार पुण्यात वाकडमध्ये समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड मधील राहटणी येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने अब्रू वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिचा उजवा पाय जायबंदी झाला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस स्थानकात महिलेने अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने या महिलेच्या घरात थेट प्रवेश केला. तुमचा नवरा पोलीस चौकीत आहे, तुम्हाला पोलिसांनी बोलावलं आहे. असे म्हणत अज्ञात आरोपीने ३० वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरात आल्यानंतर त्याने  महिलेचे तोंड दाबून, गळ्यावर चाकू लावला आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेली महिला आतल्या रुममध्ये पळाली व पहिल्या मजल्यावरील बेडरूमधल्या बाल्कनीतून थेट खाली उडी मारली. ही महिला खाली उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर पडली. यात महिला गंभीर जखमी झाली.

महिलेचा उजवा पाय जायबंदी झाला असून हाताच्या बोटांना जबर मार लागला आहे. ही घटना घडली तेव्हा तिची दोन्ही मुल घरी होती. याप्रकरणी वाकड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी नालासोपाऱ्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीने अपहरण करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने एका अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारली. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथे राहणारी (वय १२ वर्षे) मंगळवारी दुपारी आर. के. महाविद्यालयाजवळील एका इमारतीत साहित्य घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका व्यक्तीने तिला बळजबरीने इमारतीच्या गच्चीवर नेले.

त्याने तिथे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी धावा केला आणि थेट गच्चीवरून उडी मारली. ती उडी मारत असताना खाली असलेल्या गॅरेज चालकांनी रिक्षाच्या रबरी छत (हुड) पसरून तिला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरण, पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. इमारतीवरून तिने उडी मारली तो परिसर निवासी इमारतीचा आहे.