सांगली शहरातील फलकाने सर्वत्र चर्चा; राजकारणातून नवी रोजगारनिर्मिती

सांगली : निवडणूक प्रचारासाठी चहा-भडंगावर अथवा भेळभत्त्यावर कार्यकत्रे उपलब्ध होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. कार्यकर्त्यांपासून ते प्रचारापर्यंत हळूहळू सारी यंत्रणाच भाडोत्री होऊ लागली आहे. बदललेल्या या वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर सांगली महापालिका निवडणुकीसाठी शहरात थेट  प्रचारासाठी मुले भाडय़ाने देण्याची व्यवस्था एकाने केली असून तसा फलकही लावला आहे.

सांगलीत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्व पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू आहे. या वेळी प्रत्येक जण आपल्या शक्तीचे जोरदार प्रदर्शन करून पक्षनेत्यांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या शक्तिप्रदर्शनासाठी बहुतांश नेत्यांनी हे भाडोत्री कार्यकर्ते गोळा केलेले होते. वेगवेगळय़ा पक्षांच्याच नव्हे तर उमेदवारांच्या समर्थनासाठी तेच तेच समर्थक दिसू लागल्याने या गर्दीमागचे ‘अर्थकारण’ यापूर्वीच उघड झाले आहे. ही अशी प्रचारासाठी भाडोत्री कार्यकर्ते देण्याची यंत्रणेची चर्चा दबक्या आवाजात सुरू असताना आता शहरात थेट या बाबतचे फलक लागल्याने मंगळवारी खळबळ उडाली.  शहरातील हरिपूर रस्त्यावर लावलेल्या या फलकावर प्रचारासाठी भाडय़ाने मुले मिळतील असे लिहिले असून, त्यासाठी प्रती दिवस एक हजार रुपये दरदेखील जाहीर केलेला आहे.  हा फलक लागल्यावर शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ‘समाज माध्यमा’वरदेखील या फलकाचे छायाचित्र फिरू लागले. प्रत्यक्ष फलकाजवळदेखील लोक गर्दी करून कुतूहलाने हा फलक वाचत होते. मात्र ही जाहीर चर्चा सुरू8५ होताच संपर्कासाठी दिलेल्या दोन्ही क्रमांकांवर दूरध्वनी लागणे बंद झाले. यामुळे या प्रकारामागचे गौडबंगाल आज उघड झाले नाही.