News Flash

हा तर न्यायालयाला निकाल देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न

अकोला येथील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी यशवंत सिन्हा यांचे आज नागपूर येथे आगमन झाले.

माजी मंत्री यशवंत सिन्हा

सरसंघचालकांच्या वक्तव्यावर यशवंत सिन्हा यांची टीका; राम मंदिर उभारण्याचा मुद्दा

नागपूर : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अयोध्येत राम मंदिर उभारण्यासंदर्भात कायदा कसा केला जाऊ शकतो, असे करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला निकाल देण्यापासून रोखणे होय, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर केली.

अकोला येथील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी यशवंत सिन्हा यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि खासदार व आपचे नेते संजय सिंह होते.

ते म्हणाले, मी भाजप सोडली आहे. पण सर्वसंमतीने किंवा न्यायालयाच्या निर्णयाने राम मंदिर बनवण्याची भूमिका भाजपची आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तेव्हा निकालाची प्रतीक्षा करायला हवी. संघाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उद्योगपती रतन टाटा, नोबल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी आदींना विविध कार्यक्रमासाठी बोलावून संघ बदलतो आहे, असे चित्र  निर्माण केले असले तरी  राम मंदिराबाबत  सरसंघचालकांनी केलेल्या वक्तव्यावरून संघ कधीही बदलू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे, असे यशवंत सिन्हा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सर्व प्रमुख मंत्री खुजे आहेत. मोदी मंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत. प्रादेशिक पक्षांनी एकत्र आल्यास २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करणे सोपे जाईल. पोटनिवडणुकीतून हे दिसून आले आहे. राजस्थानच्या निवडणुकीत भाजप पराभूत होणार आहे, तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे अटीतटीची लढाई आहे, असेही ते म्हणाले. सरकार भारतीय आयुर्विमा महामंडळातील सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करू पाहते आहे. या पैशातून बडय़ा उद्योजकांना कर्ज माफ करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होत्या म्हणून हे सरकार चालू शकले. आता थोडी दरवाढ झाली आणि या सरकारचे संपूर्ण अर्थ नियोजन कोसळले आहे, असेही ते म्हणाले.

राफेल घोटाळ्यात मोदी अडकले -सिन्हा

भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही पंतप्रधान मोदी हे राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळ्यात अडकले आहेत, असा आरोप केला. मोदींनी अहंकार सोडावा आणि चूक झाल्याचे मान्य करावे, जनता त्यांना माफ करेल, अशी सूचनाही त्यांनी केली. आपचे नेते व खासदार संजय सिंह यांनी मोदींच्या चेहऱ्यावरील लाली राफेलच्या घोटाळ्याच्या दलालीमुळे आली आहे, असा आरोप केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 4:28 am

Web Title: yashwant sinha comment on rss chief statement over ram temple issue
Next Stories
1 नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश कायम
2 बलात्कार पीडितेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी
3 सीताबर्डीतील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मन:स्ताप
Just Now!
X