जिल्ह्यात करोना संसर्गामुळे मृत्यूसंख्या वाढत आहे. ही अतिशय दुर्देवी बाब आहे. करोनाबाधितांची मृत्यूसंख्या रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आज (शनिवार) सर्व विभागांना दिले. करोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यासाठी सर्व यंत्रणेने गांभीर्यपूर्वक काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येथील नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ७०० वर, तर मृतांची संख्या २५ वर पोहचली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच संबंधित भाग त्वरित प्रतिबंधित करून संबंधित रुग्णाच्या संपर्कातील ‘हाय व लो-रिस्क’ व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन कमी वेळात संपर्कातील १०० टक्के लोकांचे नमूने तपासणीकरीता पाठविणे, या बाबींना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ‘आयएलआय’ (ताप, सर्दी, खोकला) किंवा ‘सारी’ (ताप, सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास) ची लक्षणे तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून असेल, तर अशा व्यक्तींचे नमूने त्वरित प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना केल्या. शहरी व ग्रामीण भागात नागरिकांची नियमीत आरोग्य तपासणी काळजीपूर्वक होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राम व तालुकास्तरीय समितीने यात निष्काळजीपणा केल्यास संबंधित समितींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.

करोनाची लक्षणे असलेले व्यक्ती अतिशय गंभीरावस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे मृत्यूसंख्या वाढल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले. यंत्रणेकडून कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कोविड केअर सेंटरमधील नागरिकांचा ताप व एसपीओटू नियमित तपासण्याच्या सूचना देऊन पूर्वव्याधींनी ग्रासलेल्या नागरिकांची यादी शहरी आणि ग्रामीण भागात अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. पूर्वव्याधीग्रस्त नागरिकांना त्यांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस करण्यासाठी नगर परिषद आणि तालुकास्तरावर कॉलसेंटर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी तहसीलदार व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिले. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून रोज आढावा घ्यावा. तपासणीकरीता नमूने देण्यासाठी नागरिकांनी कोविड केअर सेंटरची भीती मनात बाळगू नये असे सांगून अहवाल निगेटिव्ह आला तर तत्काळ घरी जाता येते, पॉझिटिव्ह आल्यास वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल, असे एम.डी. सिंह म्हणाले. रोटेशन पध्दतीने वॉर्ड व क्षेत्रनिहाय भेटी देऊन नमूने जमा करता येईल का, याबाबतही नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

२५ हजार ॲन्टीजन किटसाठी दोन कोटींचा निधी
जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांच्या चाचणी करण्याकरीता २५ हजार ॲन्टीजन किट खरेदी करण्यात येणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. सदर किट प्राप्त होताच एका आठवड्याच्या आत सर्व १६ तालुक्यात देण्यात येईल. तसेच ॲन्टीजन किटद्वारे दरदिवशी किमान ३०० तपासण्या करण्याची सूचनाही त्यांनी दिल्या.