करोना संसर्गाच्या भयाने शहरांसह ग्रामीण भागातील जनताही दहशतीत आहे. यवतमाळ हा आदिवासी व बंजाराबहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात बंजारी व कोलामी या दोन भाषा बोलल्या जातात. त्यामुळे करोना संदर्भात नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी मराठीसोबतच या दोन्ही भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाने पुढाकार घेतला.

यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश नागरिक राज्यात व परराज्यात कामगार म्हणून तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त गेले आहेत. देशात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर या नागरिकांचे लोंढे स्वजिल्ह्यात परत निघाले. मात्र प्रवासाच्या साधनांअभावी हे नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या लोकांसह ज्यांना करोनाच्या भयाने ग्रासले आहे, घरात एकाकी आहे, करोनामुळे आपले काय होईल म्हणून वैफल्यग्रस्त झाले आहेत अशा नागरिकांसाठी ‘मोकळेपणाने बोला’ ही समुपदेशन मोहीम सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाने हाती घेतली आहे. आम्ही आपल्यासोबत आहोत हा विश्वास देण्यासोबतच करोना विरूद्धच्या या लढाईत आपण सर्व सोबत आहोत हा दिलासा या समुपदेशनादरम्यान दिला जात आहे.

समाजमाध्यमांवर या संदर्भातील संदेश सार्वत्रिक झाल्यापासून राज्यातील विविध ठिकाणांहून करोना संसर्गास कसे सामोरे जावे, एकटेपणा कसा दूर करावा, आम्ही आमच्या गावी, घरी कसे पोहचू आदी प्रश्न विचारले जात असल्याची माहिती या प्रकल्पाचे संयोजक प्रा. घनश्याम दरणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या समुपदेशनाकरीता बारा प्रशिक्षित समाज कार्यकर्ते व विद्यार्थ्यांची चमू काम करीत आहेत. त्यात दोन विद्यार्थी बंजारी तर एक विद्यार्थी कोलामी भाषेतून प्रश्नकर्त्यांचे समुपदेशन करीत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत मानसिक धैर्य वाढविण्यासाठी अशा सेवेची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे प्रा. दरणे यांनी सांगितले. या उपक्रमास राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.