योगेंद्र यादव यांचा पुढाकार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भावनिक मुद्दय़ांपेक्षा मुलभूत मुद्दे पुढे यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या मदतीने शनिवारी ‘देश माझा, मत माझे व मुद्दा माझा’ हा उपक्रम देशभर शेकडो ठिकाणी घेण्यात आला. स्वराज्य अभियानचे योगेंद्र यादव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

दिल्लीत शहिदी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी निवडणूक प्रचारात प्रत्येक राजकीय पक्षाचे उत्तरदायित्त्व निश्चित करायला हवे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. प्रचारात जनतेच्या दैनंदिन समस्यांना भिडणारे प्रश्न यावेत यासाठी ही सुरुवात आहे अशी अपेक्षा निखिल या कार्यकर्त्यांने व्यक्त केली. कोणता पक्ष जिंकणार यापेक्षा प्रमुख समस्यांची चर्चा होणे महत्त्वाचे आहे अशी नागरिकांची भावना होती. प्रचारात सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजाचे मुल्यमापन व्हायला हवे. मात्र गेल्या महिनाभरात भावनिक मुद्दे पुढे करून मुळ मुद्दे गायब केले जात असल्याची नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरण रक्षण, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे निर्मुलन, सामाजिक सौहार्द व घटनात्मक संस्थांचे रक्षण हे मुद्दे त्यामुळे हे मुद्दे घेऊन नागरिकांनी जागरून रहायला पाहिजे अशी अपेक्षा देशभरात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादाच्या नावाखाली मुळ मुद्दय़ांपासून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका प्रा. अपुर्वानंद यांनी जयपूर येथील कार्यक्रमात केली. ग्वाल्हेर येथील कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी राममनोहर लोहीया यांच्या कार्याची महती सांगितली. २३ मार्च हा लोहियांचा जन्मदिन होता. राज्यात मुंबई, पुणे, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ येथे हे कार्यक्रम झाले.

औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांनी विविध मागण्या केल्या. परिवर्तनवादी संघटनांनी शनिवारी शहरातील क्रांती चौकात जागर केला. शेतकरयांच्या मालाला रास्त भाव मिळाला नाही तर त्यांना अनुदान देण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किमान पाच हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे. तसेच अन्य कामगार व शेतकरीही हितांच्या मागण्यांचा हा जागर होता असे जय किसान आंदोलनाचे सुभाष लोमटे यांनी सांगितले.