सोलापूरमध्ये एका टोळक्याने एम्प्लॉयमेंट चौकात सोमवारी रात्री अक्षरश: हैदोस घातला. या तरुणांनी भररस्त्यात वाहतूक अडवत मित्राच्या वाढदिवसाचा केक कापला. तलवारीने हा केक कापण्यात आला असून केक कापल्यानंतर हे तरुण हातात तलवारी आणि एअरगन घेऊन रस्त्यावरच नाचत होते. अखेर या ‘सेलिब्रेशन’ची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार तरुणांना अटक केली.
एम्प्लॉयमेंट चौकातील काडादी चाळीसमोर काही तरूण भररस्त्यात वाहतूक अडवून वाढदिवस साजरा करत होते. हातात तलवारी आणि एअरगन घेऊन हे तरुण रस्त्यात नाचत होते. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आणि काही काळ भीतीचे वातावरणही निर्माण झाले. याशिवाय वाहतुकीचाही खोळंबा झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांना अटक केली.
प्रतीक राजशेखर धनाळे (वय ३०, जोडभावी पेठ, सोलापूर), प्रकाश शंकर कांबळे (वय २५, मूळ रा. सोन्याळ, ता. जत, जि. सांगली, सध्या रा. काडादी चाळ, सोलापूर), राहुल अनिल शिंदे (वय २८, रा. लक्ष्मी नर्सरी, उरळी कांचन, पुणे, सध्या रा. काडादी चाळ, सोलापूर ) व अनूर सिध्देश्वर प्रक्षाळे (वय ३२, कोनापुरे चाळ, रेल्वे लाईन्स, सोलापूर) अशी या चौघांची नावे आहेत. यातील प्रतीक धनाळे या तरुणाचा सोमवारी वाढदिवस होता आणि त्यानिमित्त हे धुडगूस घातला जात होता. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात हत्यारे बाळगून सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता रोखून धरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 10:15 am