आंबोली कावळेसाद येथे खोल दरीत पडलेल्या कोल्हापूर येथील रोहित किशोर भिसे (२५) या युवकाचा मृतदेह सोमवारी दुपारी थिरशिंगे हद्दीत छोटय़ा ओढय़ात सापडला. सांगोली येथील बाबल अल्मेडा टीम, सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचरचे रामेश्वर सावंत, डॉ. कमलेश चव्हाण, हिमाके अ‍ॅडव्हेंचरचे नितीन आयनापुरे या तीन टीमने योग्य नियोजन करून मृतदेहाची शोधमोहीम पूर्ण केली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरीही तितकीच महत्त्वाची ठरली.
कोल्हापूर येथे प्युअरे कंपनीत कामाला असलेल्या ११ युवकांचा ग्रुप आंबोली येथे वर्षां पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आला असता त्यांच्यासोबत असलेला रोहित भिसे हा अचानक आलेल्या पावसाच्या पाण्याच्या लोंढय़ाबरोबर कावळेसाद पॉइंट कठडय़ाला लागून असलेल्या पाइपमधून वाहत जात दरीत पडला होता.
दाट धुके, अंधूक प्रकाश यामुळे रविवारी शोधपथकांना रोहितचा शोध घेता आला नव्हता. मात्र आज तिन्ही पथकांनी अतिशय नियोजन करून सकाळी सात वाजता मोहीम सुरू केली, बाबल आल्मेडा आदी टीमने कलंबिस्त येथून जंगलमय भागातून शोध सुरू केला, तर डॉ. कमलेश चव्हाण, रामेश्वर सावंत व नितीन आयनापुरे टीमने कावळेसाद पॉइंट कठडय़ावरून सुमारे दोन हजार दोनशे मीटर दरीत उतरून शोध घेतला. दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रोहित याचा मृतदेह दृष्टीस पडला. थिरशिंगे हद्दीत छोटय़ा ओढय़ात मृतदेह अडकून होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत आला होता. दरम्यान, संपूर्ण शोधमोहिमेवर पो. निरीक्षक रणजीत देसाई लक्ष ठेवून होते. त्यांच्यासोबत पो. हे. कॉ. गजेंद्र भिसे, विकास नर, संजय खाडे, सर्रफशन मुजावर, रामचंद्र तेली आदींनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. रोहित याचे वडील, चुलते, मामा, भाऊ आदी रविवारीच रात्री आंबोलीत दाखल झाले होते. रात्री उशिरा रोहित याचा मृतदेह आंबोलीत आणण्यात आला. मृतदेह पाहून वडील, भाऊ आदींनी एकच आक्रोश केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.