कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व ज्ञानाचा अभ्यास करून नवनवीन प्रयोग युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत करावेत व कृषी क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करून द्यावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येथील मीडिया एक्झिबिटर्स आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नाशिक जिल्ह्याने फळ, फुले व अन्नधान्य क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून राज्यातच नव्हे तर देशातही गौरवास्पद कामगिरी केली आहे. असंख्य संकटांवर मात करीत राज्यातील शेतकरी स्वाभिमानी व स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायत, वायनरी प्रकल्प तसेच डाळिंबासह फलोत्पादन क्षेत्रात अत्यंत चांगली कामगिरी बजावली असल्याचे थोरात यांनी नमूद केले. राज्यात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा या वेळी थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्तविकात मीडिया एक्झिबिटर्सचे संजय न्याहारकर यांनी प्रदर्शनामागील भूमिका मांडली. तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शन पाच दिवस सुरू राहणार असून यामध्ये ३७५ कक्ष मांडण्यात आले आहेत. आठ परदेशी कंपन्यांचाही सहभाग आहे.