गोंदिया : भंडारा शहरात दिवसाढवळ्या हेडगेवार चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर तरुणाचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मोटारसायकलला कट मारल्यामुळे बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान खुनाच्या घटनेत झाले. सर्फराज ऊर्फ बाबू कासिम शेख (१८) असे मृताचे नाव आहे. मृत हा लाला लजपतराय वॉर्डातील मशीद परिसरातील रहिवासी आहे. शुभम श्रीधर वाघाये (३०) असे आरोपीचे नाव आहे. तो भंडारातील हलधरपुरी शुक्रवारी भागात राहतो.

हेडगेवार चौक ते राजस्थानी मंगल कार्यालय या मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर ही घटना घडली. मृत सर्फराज हा आपल्या दोन मित्रासह मोटारसायकलने जात होता. दरम्यान, त्यांच्याच मागे आरोपी शुभम वाघाये इतर दोन सोबत्यासह जात होता. या दोघांच्या मोटारसायकलला धडक लागल्यावरून शाब्दिक वादावादी झाली. वाद हमरीतुमरीवर येताच रागाच्या भरात शुभम याने शेजारी सळाखी तोडण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पडलेली लोखंडी सळी उचलून डोक्यावर व कपाळावर वार केला.

त्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पुढील तपास भंडारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कणसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.